गोंदिया| शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर ( Shiv Sena’s Uddhav Thackeray group and Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi )यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीशी महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी केले आहे.
येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी आले असता पटोले यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. भारतीय जनता पक्ष आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही त्यांनी टीका केली.
वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याचा निर्णय शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि त्यांचे नेते उद्धव ठाकरे यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे या युतीशी महाविकास आघाडीचा कोणताही संबंध नाही, असे पटोले म्हणाले.
‘मुनगंटीवार यांना सत्तेचा माज’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्यात कायम वाद आहेत आणि ते तसेच राहू दे, असे विधान वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी केले होते. या विधानाचा पटोले यांनी समाचार घेतला. मुनगंटीवार आणि त्यांचा पक्ष भाजप यांच्याकडे आता सत्ता आहे. त्यांनी काय बोलावे हे कोण काय सांगणार? त्यांना सध्या सत्तेचा माज आला आहे, अशी टीका त्यांनी केली.
(Nana Patole: Aghadi has no connection with Thackeray-Ambedkar alliance)