कराड ।2024 साठी शिरूर मतदारसंघातून (Shirur Lok Sabha Constituency)राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) इच्छुक आहात का, या प्रश्नावर उत्तर टाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केलेल्या कौतुकाला संधी कशी मानायची? आधी ऑफर तर येऊ द्या,(Let the offer come first) असे म्हणत भाजप प्रवेशाच्या (BJP entry) चर्चेवर खुसखुशीत भाष्य केले.
‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा साताऱ्यात प्रयोग होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांची कराडमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
अमोल कोल्हे शिरूर मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यांनी या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केला. आगामी निवडणुकीतही अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत होईल, असा अंदाज होता. मात्र, पार्थ अजित पवार हे अमोल कोल्हे यांच्याच जागेवर शिरूरमधून लोकसभा लढवणार, अशी चर्चा आहे. त्यामुळेच कोल्हे नाराज असल्याची चर्चा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचा नकार डावलून पार्थ अजित पवार रिंगणात उतरले. त्यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. मात्र, या ठिकाणी पार्थ यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे ते आता शिरूरमधून इच्छुक असल्याचे समजते. या चर्चेमुळेच अमोल कोल्हे यांच्या नाराजीच्या बातम्या वारंवार येतात.
यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज नाही. या नाराजीच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. याबाबत मी वरिष्ठांना स्पष्टीकरण दिले आहे. हे संशयाचे धुके अकारण तयार केले जात आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवाय हे संशयाचे धुके वारंवार पेरले जात असेल, तर ही माझ्या कामाची पोचपावती म्हणावे लागेल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. मात्र, 2024 साठी शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहात का, या प्रश्नावर उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणाचे कौतुक केले. याचा अभिमान वाटतो. तो पंतप्रधानांच्या मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल. मात्र, या कौतुकाला संधी कशी मानायची, असा सवाल त्यांनी केला. त्यासाठी आधी ऑफर तर यायला हवी, असे मिश्किल उत्तर दिले. शिवाय सध्या माझ्यासमोर ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य ही एकच ऑफर असल्याचे ते म्हणाले.