Mohan Bhagwat:Kinner,Third party is not a problem but an integral part of the society

Mohan Bhagwat:तृतीयपंथी हे समस्या नव्हे तर समाजाचे अविभाज्य घटक

नवी दिल्ली।मानव जेव्हापासून अस्तित्वात आहे, तेव्हापासूनच तृतीयपंथी अस्तित्वात आहेत. समाजासाठी ते समस्या नाहीत तर समाजाचा अव्हीभाज्या घटक आहेत. त्यांच्या खाजगीपणाचा सन्मान होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. तृतीयपंथीयांचा सन्मान आणि हक्कांचे संरक्षण याला संघ प्रोत्साहन देईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 
 
संघ परिवाराचे मुखपत्र असलेल्या पांचजन्य (Panchjanya)आणि ऑर्गनायझर (Organizers) या नियतकालिकांना सरसंघचालकांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत विविध विषयांवर आपले विचार मांडले. भारतात इस्लामला कोणताही धोका नसल्याचेही त्यांनी नमूद केले. 
 
तृतीयपंथीयांचा आपला एक स्वतंत्र पंथ आहे. त्यांच्या देव- देवता आहेत. त्यांचे महामंडलेश्वर (धर्मगुरू) आहेत. त्यांच्याबाबतीत संघाच्या विचारांमध्ये कोणताही वेगळेपण नाही. हिंदू परंपरेने पूर्वीपासूनच त्यांचा विचार केला आहे. त्यांनाही आपण या समाजाचा एक सन्मान्य घटक आहोत याची खात्री पटेल, असे वातावरण निर्माण व्हायला हवे, असेही भागवत म्हणाले. 
 
हिंदू ही आपली ओळख आहे. हेच राष्ट्रीयत्व आहे. हिंदुस्थान हा हिंदुस्थान राहिला पाहिजे, असे सांगतानाच भागवत म्हणाले की, आज भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना इथे राहायचे असेल तर सुखाने राहावे किंवा अन्यत्र जायचे असेल तर खुशाल जावे. हा त्यांचा प्रश्न आहे. इथे रहात असताना, आम्ही पूर्वी राजे होतो. आता पुन्हा सत्ताधीश बनू, अशा बढाया कोणी मारू नयेत. मग ते मुस्लिम असोत, हिंदू असोत वा कम्युनिस्ट असोत, असेही ते म्हणाले. 
 
आज देशात हिंदू बहुसंख्य आहेत. जर हिंदू समाजाची प्रगती झाली तर संपूर्ण देशाची प्रगती होईल, असा दावा भागवत यांनी केला. मोठी लोकसंख्या हा भारतासाठी एक बोजाही आहे आणि ती एक शक्तीही आहे. लोकसंख्येचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी व्यापक धोरण आखणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 
 
लोकसंख्येतील असंतुलन ही एक घातक बाब आहे. ज्या ज्या वेळी लोकसंख्या असंतुलित झाली त्या त्या वेळी देशांचे विभाजन झाल्याची उदाहरणे जगभरात आहेत. राजकारण बाजूला ठेऊन पाकिस्तानची निर्मिती कशातून झाली याचा त्रयस्थपणे विचार केला तरी याचा उलगडा होऊ शकेल, असे भागवत म्हणाले. जगभरात हिंदू हा एकमेव समाज असा आहे की त्याने इतरांवर आक्रमण केले नाही. यापुढील काळातही अनाक्रमता, अहिंसा, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
संघ ही सांस्कृतिक संघटना आहे. त्यामुळे रोजच्या राजकीय घडामोडींमध्ये संघ भाग घेत नाही. मात्र, राष्ट्रीय धोरणे, राष्ट्रीय हित आणि हिंदू हित याच्याशी संबंधित राजकारणात संघाचा सहभाग आहे आणि राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *