MNS MAHARASHTRA POLITICS Raj Thackeray

  MNS:  लोकसभा निवडणूक, बदलती भूमिका;  मनसेची यंदा परीक्षा! 

पक्षाच्या स्थापनेनंतर मराठी अस्मितेचा मुद्दा ,मराठी भाषेला दैनंदिन व्यवहारात प्राधान्य असो अथवा स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य आदी मुद्दे घेऊन आक्रमकतेने आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) महाराष्ट्राची ब्लु प्रिंटही  सादर केली ;पण  प्रत्येक निवडणूकनिहाय मनसेची पर्यायाने पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका ही सतत बदलत गेली. त्यात मराठी भाषिकांच्या हक्कासाठी उत्तर  भारतीयांविरोधात आक्रमकता दाखवणारे राज ठाकरे (Raj Thackeray) नंतर उत्तर भारतीय मंचाच्या व्यासपीठावर उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यात आता  हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत पोहोचणारे राज  ठाकरे   भाजपच्या मदतीने धार्मिक राजकारणाची खेळी खेळू पाहत आहेत. त्यामुळे पक्ष स्थापन होऊन १८ वर्षे होत आली, मनसेला (MNS)  यश का मिळत नाही हाच मुद्दा आता महत्वाचा ठरला आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षाची बिकट अवस्था झालेल्या मनसेची यंदाच्या लोकसभेच्या (Lok Sabha Election) निमित्ताने  खरी परीक्षा ठरणार आहे ती म्हणजे स्वतःची ताकद किती ? आणि स्वतःचे अस्तित्व टिकविण्याची ! 
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात तसा काही फरक पडलेला नाही आणि पडणारही नाही असा ठाम दावा राजकीय विश्लेषकांचा आहे. एकतर आधीच वेळोवेळी भूमिका बदलणाऱ्या मनसेची वाताहत झाली आहे. एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून प्रारंभी स्वतःची स्वतंत्र ओळख मिळवणाऱ्या मनसेने ती आता कायमची गमावली आहे. भाजपने मात्र ‘प्रादेशिक पक्ष मुक्त राज्ये ‘ या धोरणातून मनसेला आधीच खिंडीत गाठले आहे. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू या’ असे स्वप्न पाहणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेची ताकद प्रारंभी जबरदस्त होती. १३ आमदार निवडून आले. साहजिकच राज्याच्या राजकारणात अन्य पक्षांना उपद्रव्यमूल्य दाखवून देणारा मनसे हा पक्ष टक्कर देणारा ठरला आणि तरुणाईला आकर्षित करणारा आणि लोकांना हक्काचा वाटणारा पक्ष ठरला. त्यातून जनाधारही वाढला. परिणामी राज्याच्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, संभाजीनगर अशा काही मोजक्या शहरात मनसेने हक्काची व्होट (VOTEBANK )बँकही  तयार केली. मात्र प्रत्येक निवडणुकीत मनसेची भूमिका बदलत गेली. इतर पक्षांच्या समीकरणांनुसार स्थान ठरवत गेले. कधी  काँग्रेस – राष्ट्रवादीच्या बाजूने तर कधी विरोधात तर कधी मोदींना पसंती दिली तर कधी भाजपच्या विरोधात आणि आता ठाकरे गटाविरोधात शिंदे – पवार गटाला साथ त्यामुळे मनसेचा जनाधार कमी झाला आहे. तसे मनसैनिकही घटले  आहेत ही  वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच ज्यावेळी १३ आमदार निवडून आले,त्याच मनसेचे नंतर  १- १ आमदार मात्र स्थानिक पातळीवर उमेदवाराच्या प्रभावानेच विजयी ठरले.याकडेही राजकीय अभ्यासक लक्ष वेधत आहेत.आता   जशी शिवसेना आणि राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे.मात्र या दोन्ही पक्षात मतांचे विभाजनापेक्षा सहानुभूतीचा फायदा मूळ पक्षांना होणार आहे. मात्र  त्यातुलनेत  मनसेची अवस्था बिकट आहे.सहानुभूती मिळणार तर नाहीच उलट मतदारांचा रोष मनसेला पत्करावा लागणार आहे.   मुळात मनसेला  गेल्या दहा वर्षात ‘जय महाराष्ट्र’ केलेल्यांची संख्या अधिक आहे. ती का तर सातत्याने भूमिका बदलण्यामुळेच मनसेला घरघर लागली आहे. त्यात आता महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याच्या भूमिकेचेही  तीव्र पडसाद उमटायला लागले आहेत. साहजिकच मनसेला पुन्हा गळती लागणार आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला मनसैनिकांनी लागावे हे एकप्रकारे दाखवलेले ‘गाजर’ च आहे. हेही राजकीय विश्लेषकांनी अधोरेखित केले आहे.  
 
दुसरे असे कि,भाजपला मनसेने दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याने काय साध्य होणार ? या प्रश्नावर राजकीय अभ्यासक म्हणतात, मुळात यंदा मतांचे विभाजन मोठ्याप्रमाणावर होणार  आहे. भाजपने जी व्यूहरचना आखली. त्यातच भाजप आता फसली आहे. परिणामी ४८ पैकी २० मतदारसंघ असे आहेत जिथे महायुतीचे उमेदवार चालणार नाहीत. तिथे महाविकास आघाडीला पोषक स्थिती असणार आहे. त्यामुळे जिथे जिथे मूळचे भाजपचे उमेदवार आहेत म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक व  अन्य मतदारसंघातील ते निवडून आणण्यासाठीच मतांचे समीकरण जुळविणे हा उद्देश असला तरी पूर्वीइतकी ताकद मनसेची राहिलेली नाही. त्यामुळे भाजपच्या पदरात मतांचे दान पडणे अवघड आहे. उदाहरण द्यायचे म्हटल्यास पुणे लोकसभा मतदारसंघाचे देता येईल.  जिथे मनसेने ७५ ते ९४ हजार मते मिळवली होती ;पण ती कधी याचाही विचार केला पाहिजे.राज्याच्या पटलावर बदलत्या राजकीय घडामोडीत मनसेची भूमिकाही सातत्याने बदलत गेलेली आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात आधीच गटातटाच्या राजकारणात विखुरलेल्या मनसेची मते आजमितीस तितकी आहेत  का ? हाच खरा प्रश्न असल्याचे राजकीय अभ्यासक नमूद करतात. अन्य राजकीय पक्षांच्या समीकरणानुसार मनसेने धोरणे बदलली त्याचा कितपत फायदा झाला हा मुद्दाही आता ऐरणीवर आला आहे.
 
गेल्या १८ वर्षांचा प्रवास पाहिला तर मनसेची अधोगतीच झाली आहे. कार्यकर्त्यांची गळती सुरूच आहे. मग अशा स्थितीत मनसेला आपलेसे करण्यामागे भाजपचा हेतू नक्की काय ? या प्रश्नावर राजकीय विश्लेषक मात्र राज्याच्या राजकीय पटलावरून मनसे आगामी काळात कुणामुळे ‘वंचित’ होईल हे येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये कळेल. मात्र जिथे काँग्रेस मुक्त भारत हा अजेंडा भाजपचा होता. तिथे काँग्रेस काही संपणार नाही हेही भाजपला माहित आहे मात्र राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची जी ताकद आहे. ज्यांचे  स्वतःचे  प्रबळ अस्तित्व आहे.अशा पक्षांना मोडीत काढून त्यांना भाजपमध्ये सामावून घ्यायचे आणि पुढील सत्ता समीकरणांचा एकहाती मार्ग तयार करायचा हेच धोरण भाजपचे आहे.त्यामुळेच त्याचा महाराष्ट्रातील पहिला बळी हा मनसेच ठरणार आहे. ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही ‘ या अवस्थेपर्यंत नेण्यात आजमितीस भाजपचा हात कुणीही धरणार नाही हे सत्य आहे.त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत पोहोचणारे राज  ठाकरे आता  भाजपच्या मदतीने धार्मिक राजकारणाची खेळी खेळू पाहत असले तरी ती कितपत यशस्वी ठरते हे येणारा काळच सांगणार आहे. विकसित भारतासाठी मोदींना मत द्या म्हणणाऱ्या   भाजपने पुढच्या लोकसभेला  मनसेप्रमाणे भूमिका बदलली तर मनसेची अवस्था काय होईल या मुद्द्याकडेही राजकीय अभ्यासक लक्ष वेधत आहेत. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘ट्रॅक’वरून भरकटलेल्या मनसेची खरी परीक्षा असणार आहे. 
 
मतांचा घसरता आलेख !
२००९साली स्वबळावर लढणाऱ्या मनसेने २०१४ला भाजपला पाठिंबा दिला आणि विधानसभा लढविण्याचा राज ठाकरे यांनी निर्णय घेतला मात्र माघार घेतली.मग २०१९ ला भाजप विरोधात ‘ लाव रे तो व्हिडीओ ‘ ही आक्रमक भूमिका घेतली आणि आता म्हणजे २०२४ च्या लोकसभेसाठी नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा ही भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते पाहता मनसेच्या मतांची टक्केवारी ही घसरली. २००९ ला ५.७१ टक्के मते २०१४ ला ३. १५ टक्क्यांवर आले आणि २०१९ ला ते २.२५ टक्के यावर आले.
असाच आलेख लोकसभा निवडणुकांचा आहे.२००९ ला ४.१ टक्के मते मिळवणाऱ्या मनसेला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १.५ टक्के मते मिळाली.
MNS: Lok Sabha Elections, Changing Role; MNS exam this year!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *