मुंबई ।भाजपचे (BJP) मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha)यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याबाबत केलेल्या तुलनात्मक वक्तव्यावर राजकीय नेत्यांकडून टीका झाल्यानंतर आता ‘छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहे. आम्ही सर्व इथे आहोत. मग त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा कोणी कसा करेल, मी तर कधीच नाही करणार ‘ अशी सारवासारव केली आहे.
शिवप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत काही मंत्री प्रतापगडावर आले होते, त्यात भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचाही समावेश होता. यावेळी भाषणात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची थेट शिवरायांशी तुलना करताना शिवसेनेतील शिंदेच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्रा सुटकेशी केली होती. या वादग्रस्त वक्तव्याने सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारपरिषद घेत आपली बाजू मांडली. लोढा म्हणाले, विरोधक काय बोलतील, त्यांचा तो अधिकार आहे. पण जे काही झाले. टीव्ही किंवा सोशल मीडियावर सुरू आहे. जे राष्ट्रवादीचे नेते बोलत आहेत, मी काय सांगितले हे त्यांनी बघितलेच असेल का? त्यांनी नाही बघितले. मी फक्त उदाहरण दिले होते. मी कधीही तुलना केली नाही आणि मीच काय तर कोणीही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहे. आम्ही सर्व इथे आहोत. मग त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा कोणी कसा करेल, मी तर कधीच नाही करणार.मी कधी वैयक्तिक टिपण्णी करत नाही. मी कधी राजकारणात जात नाही. सरकारचे काम सकारात्मकतेने करायचे आहे. महाराष्ट्रात फार समस्या आहेत. माझ्या विभागामार्फत मी त्या सोडवण्याच्या प्रयत्नात असतो. राजकारणात आजपर्यंत गेलो नाही आणि नंतरही जाणार नाही. हे जे काही झाले ते आता बंद करायला हवे. माझ्या वक्तव्यावरून जे राजकारण होत आहे, ते व्हायला नको. छत्रपती शिवाजी महाराज चमकणारा सूर्य होते, त्यांची त्याच स्थानावर पूजा केली पाहिजे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांना वादात आणणं बंद झालं पाहिजे. असेही यावेळी लोढा म्हणाले.(Mangalprabhat Lodha: After the controversial statement, now Lodha says, ‘It’s not me’)