मुंबई । गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील विविध महामंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आदी पदांवरील नियुक्त्या रखडलेल्या आहेत. काही मोजक्या महामंडळांवरील नियुक्त्या वगळता अन्य नियुक्त्यांवरून महाविकास आघाडीत मतमतांतरे अजून कायम आहेत,त्याला कधी मुहूर्त लागतो याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.असे असले तरी फडणवीस सरकारच्या काळापासून ताब्यात असलेल्या महामंडळांवर शिवसेनेचा ‘कब्जा’आजही कायम आहे.
राज्यात असलेल्या विविध महत्वाचे आणि मोक्याचे महामंडळे आपल्या ताब्यात कशी येतील यावर महाविकास आघाडीतील पक्षांचा भर आहे. त्यातही आपल्या पक्षातील नेत्यांची, मर्जीतील कार्यकर्त्यांची वर्णी लागावी यासाठी सर्व पक्ष आपापली ताकद आजमावत आहेत;पण वाटपसूत्र कसे असावे यावर मात्र महाविकास आघाडीत एकमत होताना दिसत नाही. त्यात काँग्रेसने सर्वाधिक महामंडळांची मागणी लावून धरली आहे तर शिवसेनेने आमदारांच्या संख्येनुसारच महामंडळाचे वाटप व्हावे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नियुक्त्यांचा घोळ अजून काही संपत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे विविध देवस्थानांवर महत्वाच्या पदांवर शिवसेनेचे पदाधिकारी विराजमान झाले आहेत तर साई संस्थान शिर्डी, पंढरपूरच्या श्री. विठ्ठल- रुक्मिणी मंदिरांच्या अध्यक्षपदांवर अनुक्रमे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्थान मिळवले आहे. राज्यात महत्वाच्या देवस्थानांवर महाविकास आघाडीतील पक्षातील नेत्यांची वर्णी लागली असली तरी अन्य विकास व जाती – जमातींच्या महामंडळांवर अद्याप नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्यावरून महाविकास आघाडीत मतमतांतरे आहेत. परिणामी ती सर्व पदे रिक्त असून इच्छुक मात्र मुहूर्त कधी लागतो याकडे लक्ष ठेवून बसले आहेत. त्यात काँग्रेसच्या भूमिकेमुळे या नियुक्त्या रखडल्या असून आमदारांच्या संख्येनुसार महामंडळांचे वाटप व्हावे याला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता या महामंडळांवरून महाविकास आघाडीत तोडगा कसा काढला जातो की नवा कोणता ‘कलगीतुरा’ रंगतो याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.