पुणे । राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपकडून सातत्याने आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. इतकंच नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशा, छापे असा ससेमिरा आघाडी सरकारच्या मागे लागल्याने आता भाजपला जशास तसे उत्तर देण्याची रणनीती महाविकास आघाडी सरकारकडून आखण्यात आली आहे. भाजपच्या कथित आरोपांमुळे प्रतिमा मलिन होत असल्याने आता भाजपवरच ‘ काऊंटर अटॅक’ करण्यासाठी महाविकास आघाडीने बाह्या सरसावल्या असून लवकरच राज्यातील भाजप नेत्यांसह केंद्रातील कारभारावर नेमके बोट ठेवून वचपा काढला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
सद्यस्थितीत महागाईने जनता मेटाकुटीला आली आहे. मात्र राज्यात त्यावरून जनतेचे लक्ष भरकटविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करताना ‘ एका दगडा’च्या धर्तीवर भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ‘ऑपरेशन लोटस’ मोहीम राबविण्यात आली.त्यासाठी किरीट सोमय्या, आशिष शेलार यांच्यासह अन्य नेत्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर घोटाळ्याचे कथित आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशा लावल्या. परिणामी महाविकास आघाडी सरकारच्या पदरी बदनामी पडली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे तर दहा जण चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. असे असताना महाविकास आघाडी सरकारकडून आजमितीस केवळ राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकार स्थापनेसाठी ज्यांचा मोठा वाटा आहे,ते शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे दोन नेते भाजपला प्रत्युत्तर देऊन जेरीस आणत आहेत. संजय राऊत यांनी तर भाजपकडून होणाऱ्या कोणत्याही आरोपांचे थेट ‘ पोस्टमार्टेम’ करत आहेत. तर नवाब मलिक यांनी क्रूझवरील रेव्ह पार्टीतील बनाव चव्हाट्यावर आणून भाजपच्या नेत्यांचे बिंग फोडले आहे.त्यात त्या पार्टीतील कारवाईचे फोटो, व्हिडीओ थेट प्रसारमाध्यमात प्रसिद्ध करून एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावरच आक्षेप घेतला. इतकेच नाहीतर या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्यांची नावे त्यांनी उघड केल्याने भाजप नेत्यांची तोंडे बंद झाली आहेत. त्यात नवाब मलिक यांनी देवेन्द्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील कारभाराचा बुरखा फाडल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर मुंबईत ड्रग्जचा खेळ सुरु होता, असा गंभीर आरोपही राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. तसेच अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट करत ‘या’ ड्रग्स पेडलरचं भाजपसोबत कनेक्शन काय? असा सवाल केल्याने राज्यात खळबळही उडाली होती. मलिक यांनी अमृता यांच्यासोबतची फोटोमधील व्यक्ती ही जयदीप राणा असल्याचे स्पष्ट करून जयदीप राणा हा ड्रग्ज ट्राफिकिंगमध्ये सध्या तुरुंगात असून या ड्रग्ज माफियासोबत फडणवीसांचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांची पत्नी अमृता यांनी नदी संवर्धनासाठीचे गाणे गायले होते. त्या गाण्यावर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता यांनी अभिनय केला होता. त्यासोबतच तत्कालिन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही अभिनय केला होता, त्याचा उल्लेख करुन मलिक यांनी त्या गाण्याचा फायनान्सर हा जयदीप राणा होता असा दावाही केला होता. फडणवीस यांच्याच काळात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाल्याकडेही मलिक यांनी लक्ष वेधले होते आणि मुंबईत ड्रग्जचा गोरख धंदा वाढवण्यासाठीच वानखेडे यांना एनसीबीमध्ये आणले गेले का? असाही सवालही केला होता. मलिक यांनी आता नोटबंदी असू द्या किंवा राफेल लढाऊ विमान खरेदी यावरून केंद्र सरकार पर्यायाने भाजपवर टीका करण्यास प्रारंभ केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत हेही भाजपच्या कारभारावर टीकेची तोफ डागत आहे . त्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मलिक यांच्याकडून रेव्ह पार्टीबाबत इत्यंभूत माहिती घेतली असून ‘ लॉजिकल एन्ड’ पर्यंत हे प्रकरण नेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे हे प्रकरण भाजपला महागात पडणार आहे. त्यात ड्रग्स प्रकरणाबाबत मलिक यांनी केलेल्या आरोपाला बगल देण्यासाठी देवेन्द्र फडणवीस यांनी मलिक यांचा अंडरवर्ल्डशी कसा संबंध यावर भाष्य करून अप्रत्यक्ष जुना विषय काढून राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. ड्रग्स प्रकरणातून विषयांतर करण्यासाठी फडणवीस यांनी ही भूमिका मांडल्याचे बोलले जात असले तरी दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या आरोप – प्रत्यारोपांमुळे राजकीय आखाडा गाजत आहे. त्यात आता भाजपला जेरीस आणण्यासाठी भाजपच्या सत्तेच्या काळात झालेल्या अनागोंदी कारभाराचे कागदपत्रे ‘गोळाबेरीज’ करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सुरु झाले आहे. त्यासाठी आता तिन्ही पक्ष एकवटणार असून नेत्यांची फळी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार आहे. ‘जशास तसे’च्या धर्तीवर भाजपला गारद करण्याची रणनीती असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी काळात कोण कुणाला गारद करतो? हा भाग जितका महत्वाचा आहे,त्याहीपेक्षा भाजप कोंडीत अडकतो का ? हा प्रश्न महत्वाचा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.