मुंबई |
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपने सत्ताधाऱ्यांना जेरीस कसे आणता येईल यावरच भर दिला आहे. त्यात भाजपचे नेतेही महाविकास आघाडीतील मंत्री कसे कोंडीत सापडतील यासाठी व्यूहरचना आखत आहेत आणि एक एक प्रकरणे बाहेर काढत आहेत. त्यानुसारच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भाकीत वर्तवले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील ११ नेते लवकरच गोत्यात येतील. असे त्यांनी म्हटले आहे . विशेष म्हणजे या 11 नेत्यांना ईडी किंवा सीबीआय कारवाई करून अटक करणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांना केलेल्या फोनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आतापरिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट बेकायदा ठरल्यानंतर आता वांद्रे पुर्वेकडील कार्यालयावर कारवाईचे आदेश लोक आयुक्तांनी दिले आहेत. यासंदर्भातील माहिती खुद्द भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ही माहिती देताना सोमय्या यांनी राज्य सरकारमधील परब यांच्यासहित किमान अकरा मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या चौकशीचा सिलसिला पाहायला मिळणार हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख, प्रताप सरनाईक ,रवींद्र वायकर, भावना गवळी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, यशवंत जाधव, यामिनी जाधव ,मिलिंद नार्वेकर ,छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड हे सध्या ‘रडार’वर आहेत.