पणजी ( गोवा ) – आयएनएस विक्रांत प्रकरणी भाजपनेते किरीट सोमय्यांवर (BJP leader Kirit Somaiya) गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयाने पिता-पुत्राचा जामीन अर्ज फेटाळला. तेव्हापासून सोमय्या बेपत्ता असल्याची माहिती येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत . त्यात आता यावर गोव्यातील राष्ट्रवादी (Nationalist Congress Party in Goa) काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (Clyde Krasto) यांनी सोमय्या आणि केंद्रीय यंत्रणांवर निशाणा साधला आहे.
किरीट सोमय्या बेपत्ता असल्याची चर्चा आहे; पण झेड प्लस सुरक्षा असलेला माणूस बेपत्ता होऊच शकत नाही.हा सरळ प्रश्न क्लाईड क्रास्टो यांनी उपस्थित केला आहे. सोमय्यांच्या ठावठिकाणाची माहिती केंद्रीय यंत्रणांना निश्चितपणे असेल. जर किरीट सोमय्या लपत असतील तर तपास यंत्रणांना आवश्यक असेल ती माहिती देणे त्यांचे कर्तव्य आहे, असे ट्विट क्लाईट क्रास्टो यांनी केले. त्यांनी हे ट्विट करून एकप्रकारे केंद्रीय गृहमंत्रालयावर आक्षेप घेतल्याचे बोलले जात आहे.आता यावर भाजपच्या गोटातून कोणती प्रतिक्रिया येते की सोईस्कर मौनव्रत धारण केले जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.