पुणे। कसबा पोटनिवडणुकीसाठी एकीकडे भाजपसह (BJP) काँग्रेस, शिवसेना पक्षातील इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु असताना दुसरीकडे अंमलबजावणी सुरू असलेल्या आचारसंहितेचा भंग (code of conduct) भारतीय जनता पक्षाकडून, तोही पालकमंत्री चंद्रकांत पाटील (guardian minister Chandrakant Patil) यांच्या मुख्य उपस्थितीत झाल्याने त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. विशेष म्हणजे कसब्यातून पोटनिवडणूक (Kasba Vidhan Sabha by-election) लढविण्यास इच्छुक असलेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने (Former Chairman of Standing Committee Hemant Rasane) यांनी स्वत:चे नाव आणि छायाचित्र तसेच पक्षाचे चिन्ह असलेल्या साहित्याचे वाटप एका कार्यक्रमावेळी केल्याचे उघडकीस आले आहे.
कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अनेकजण इच्छुक असून त्यामध्ये हेमंत रासने यांचे नावही चर्चेत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने मतदारसंघात निवडणूक आचारसंहिताही लागू झाली आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र त्यानंतरही हेमंत रासने यांनी साहित्याचे वाटप करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.
हेमंत रासने मित्र परिवारातर्फे बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या स्त्री शक्ती सन्मान कार्यक्रम तसेच हळदी कुंकू आणि मकरसंक्रांतीनिमित्त तिळगूळ वाटप कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर महिलांना हेमंत रासने यांचे नाव, छायाचित्र असलेल्या पिशव्यांचे वाटप पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीतच करण्यात आले.परिणामी आचारसंहितेमधील साहित्य वितरणाचा हा कार्यक्रम वादात सापडण्याची शक्यता असून विरोधकांकडून त्याविरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान हा कार्यक्रम गेली पंधरा वर्षे होत आहे. तसेच कार्यक्रमापूर्वी शासकीय अधिका-यांची चर्चा करण्यात आली होती. त्यांच्या सूचनेनुसार पक्षाचे झेंडे काढण्यात आले. हा कार्यक्रम खासगी आहे आणि तो खासगी ठिकाणी झाला आहे. पक्षाचा अधिकृत उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यामुळे आचारसंहितेचा कोणताही भंग झालेला नाही, अशी भूमिका हेमंत रासने यांनी मांडली आहे. (Kasba Vidhan Sabha by-election: The presence of guardian minister Chandrakant Patil is a violation of the code of conduct!)