Kasba Assembly By-Election:The candidate who gets more than 65 thousand votes will become MLA!

Kasba Assembly By-Election:६५ हजारांहून अधिक मते घेणारा उमेदवारच  होणार आमदार!

  पुणे । कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Assembly By-Election) मतदानाची टक्केवारी वाढल्याने निवडणुकीत विजयी होण्यासाठी किमान ६५ हजारांहून अधिक मतांची आवश्यकता असल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत  आहे. त्यामुळे ६५ हजारांहून जास्त मते घेणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडण्याची शक्यता आहे आणि तोच कसब्याचा किंगमेकर ठरणार आहे.  कसबा विधानसभा पोटनिवडणूक चुरशीची झाली आहे. पोटनिवडणूक असूनही ५०.०६ टक्के मतदान झाल्याने कसब्यातून कोण निवडून येणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ७५ हजार ५८ मतदार असून त्यापैकी १ लाख ३८ हजार १७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, पोटनिवडणूक भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (BJP candidate Hemant Rasane and Congress candidate Ravindra Dhangekar)अशी सरळ लढत झाल्याने अन्य उमेदवारांना मतदान  कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उर्वरित अपक्ष मतदारांना एकूण दहा हजारांच्या आसपास मतदान होईल, असे गृहीत धरले तरी हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये उर्वरित १ लाख २८ हजार १७५ मतांची विभागणी होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांना किमान ६५ हजारांहून अधिक मते मिळवावी लागणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

  ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी कसबा पेठत ५१.६ टक्के मतदान झाले होते. कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना ७५ हजार ४९२ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांना ४७ हजार २९६ मते मिळाली होती. मुक्ता टिळक २८ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना शनिवार पेठ-सदाशिव पेठ या प्रभागातून १८ हजारांचे आणि नवी पेठ-पर्वती प्रभागातून ५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहाता पोटनिवडणुकीत सहा प्रभागांपैकी पाच प्रभागांमधील मतदानाच्या टक्केवारीमध्ये जास्त बदल झालेला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मात्र शनिवार पेठ-सदाशिव पेठ या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत पाच टक्के कमी मतदान झाल्याचेही दिसून येत आहे. उर्वरित प्रभागात दीड टक्क्यांपर्यंत मतदान कमी झाले आहे. त्यामुळे पेठातून सर्वाधिक मताधिक्य घेणारा उमेदवार विजयापर्यंत पोहोचणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

इथे असेल उमेदवारांची भिस्त 

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पूर्व भागापेक्षा  पेठ भागात सर्वाधिक मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.जरी त्यात मागील निवडणुकीइतकी मतदानाची टक्केवारी नसली तरी   सदाशिव, नारायण, शनिवार आणि कसबा पेठांतील मतदान पोटनिवडणुकीतील विजयात निर्णायक ठरणार आहे.त्यामुळे  शनिवार पेठ-सदाशिव पेठ या प्रभाग क्रमांक पंधरा आणि नवी पेठ-पर्वती या प्रभाग क्रमांक २९ या प्रभागातून मिळणाऱ्या  मताधिक्यावर भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांची भिस्त आहे. तर शिवाजी रस्ता ते नेहरू रस्ता यामधील रविवार पेठ, गणेश पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडे पेठांमध्ये, तसेच मुस्लीम आणि दलित वस्ती असलेल्या भागातील मताधिक्यावर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची भिस्त असेल. भाजपा आणि काँग्रेसच्या हक्काच्या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवार किती मताधिक्य घेतात, यावरही विजयाचे गणित निश्चित होणार आहे.(Kasba Assembly By-Election:The candidate who gets more than 65 thousand votes will become MLA!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *