गेल्या महिन्याभरापासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी (kasba Assembly By-election) मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठा विजय झाला आहे. पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवत भाजपाच्या (BJP) हेमंत रासनेंचा (Hemant Rasne)तब्बल ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे.एकप्रकारे हा भाजपचा दणदणीत पराभव असून हिंदुत्व, मोदी सरकारच्या योजना, मतदारसंघाऐवजी शहरातील विकासकामे या मुद्द्यांवर भाजपचा प्रचार प्रभावी ठरला नाही हे स्पष्ट झाले आहे. ‘कॉमन मॅन’मुळे एका व्यक्तीकडून भाजप पराभूत हे चित्र नागरिकांमध्ये आहे शिवाय सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी एकत्र येऊन लढत दिली तर यश कसे मिळते हेही महाविकास आघाडीने दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी काळात ‘इलेक्टीव्ह मेरिट’ हेच कार्ड जनतेसमोर चालणार आहे हेच यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.
गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेला हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात आला आहे. रवींद्र धंगेकरांच्या रुपाने महाविकास आघाडीला भाजपावर मोठा विजय मिळाल्याचे दिसून येत आहे. मात्र भाजपमध्ये तर या निकालावरून घमासान होण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत. ‘पराभव हेमंत रासने यांचा नाही तर भाजपचाच’ हे स्पष्ट झाल्याने त्यावरून आता पक्षात कलगीतुरा रंगणार आहे. त्यात भाजपची रणनीती कुठं फसली आणि कुणामुळे नामुष्की ओढावली यावरून वाद पेटणार असला तरी उमेदवारावरच खापर फोडण्यापर्यंत मजल जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी पराभवामागे मी स्वतःच कमी पडलो अशी प्रतिक्रिया दिली आहे.
तब्बल २८ वर्षांनंतर कसब्यामध्ये आमदारकी भाजपाकडून काँग्रेसकडे आली आहे. याआधी १९९२ च्या निवडणुकीत कसब्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. २००९ मध्येही कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी गिरीश बापट यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले. यंदाच्या निवडणुकीत भाजपाविरोधी असणारी नाराजी रवींद्र धंगेकरांच्या पथ्यावर पडल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे मतदारांना गृहीत धरणे, मतदारसंघाचे प्रश्न बाजूला ठेवून शहरात विकासकामे कशी झाली आणि केंद्रात मोदी सरकारने कशा योजना आणल्या या ‘मदार’वर राहणाऱ्या भाजपला जनतेला लाथाडले हे वास्तव या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने समोर आले आहे. त्यात राज्यात एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकार जनतेच्या पचनी पडलेले नाही ही बाबही दुर्लक्षून चालणार नाही. शिक्षक – पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून त्याचा दाखला मिळाला आणि कसब्याच्या निकालामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
सन २००९ ची विधानसभा निवडणूक रवींद्र धंगेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढविली होती. त्यावेळी त्यांनी गिरीश बापट यांना कडवे आव्हान दिले होते. त्या निवडणुकीत गिरीश बापट यांना सात हजार मतांनी निसटता विजय मिळाला होता.यंदा ११ हजार ४० मतांनी धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवामुळे भाजपच्या गोटात आता रणनीती कशी फसली आणि कोण कारणीभूत यावरून कलगीतुरा रंगणार आहे. ज्या -ज्या भागांना भाजपने ‘लक्ष्य’ केले, तिथेच भाजपच्या रणनीतीला छेद देत महाविकास आघाडीने मात केल्याची चर्चा आहे. त्यात हक्काचा भाग असलेल्या पेठांकडे भाजपने हवे तसे लक्ष न दिल्याने त्याचा मोठा फटका भाजपला बसला आहे.त्यामुळे मतमोजणीनंतर पेठांमध्ये घात झाला की, प्रतिस्पर्धी उमेदवाराला गोत्यात आणण्यासाठी आखलेल्या व्यूहरचनेत दगाफटका कसा झाला यावरच भाजपच्या गोटात मंथन करावे लागणार आहे.शिवाय जनमताचा कौल आता गंभीरतेने घ्यावा लागणार आहे. असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
वास्तविक कसबा मतदारसंघाचे पूर्व आणि पश्चिम असे विभाग पडतात. पूर्व विभागात महापालिकेचे प्रभाग क्रमांक १६, १७, १८ आणि १९ येतात तर पश्चिम विभागात महापालिकेचे १५ आणि २९ प्रभाग येतात. पश्चिम भागात प्रभाग क्रमांक १५ मध्ये शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ शुक्रवार पेठेचा परिसर येतो. तर प्रभाग क्रमांक २९ मध्ये नवी पेठ, दत्तवाडी आणि दांडेकर पुलाचा भाग येतो. या भागावर भाजपचे वर्चस्व असले तरी मागील पक्षनिहाय समीकरणे पाहिल्यास तसेच सद्यस्थितीत भाजपमधील अंतर्गत नाराजी मोठ्याप्रमाणावर आहे.
पूर्व भाग म्हणजे कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ, लोहियानगर, गंज पेठ, मोमिनपुरा असा भाग येतो. हा भाग मागासवर्गीय आणि मुस्लीमबहुल भाग म्हणून परिचित आहे.विशेषतः अठरापगड जातींचा आणि कष्टकरी वर्गांचा हा भाग आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला साथ देणारा हा भाग मानला जातो. त्यात या भागात रवींद्र धंगेकर गेली अनेक वर्ष काम करत असून ‘आपला हक्काचा माणूस’ म्हणून रवींद्र धंगेकर यांची प्रतिमा आहे. त्यात महत्वाची बाब म्हणजे इथे काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला मानणाराही वर्गही आहे. ज्यांच्यामुळे मागील पालिका निवडणुकीत भाजपच्या नेत्याला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
कसबा मतदारसंघात यंदा साधारण १ लाख ३८ हजार इतके मतदान झाले आहे.मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत ते दीड टक्क्यांनी घसरले. पोटनिवडणुकीला मतदान कमी होते असे गृहीत धरले जाते मात्र या पोटनिवडणुकीत तसे मतदान चांगले झाले. या मतदारसंघात मोडणाऱ्या सहा प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १५ मध्ये ३७ हजार ३०० मतदान झाले. वास्तविक हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी इथे मतदान घटले. त्याचा फटका कसा बसला यावर आता भाजपला आत्मचिंतन करावे लागणार आहे. नवी पेठ, पर्वती या २९ नंबर प्रभागामध्ये १९ हजार मतदान झाले. प्रभाग क्रमांक १५ आणि २९ या दोन्ही प्रभागांत ५६ हजार मतदान झालेले आहे. मात्र त्यातील किती टक्के मतदान महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पदरात पाडून घेतले हा भाग आता महत्वाचा ठरणार आहे.
पूर्व भागात रविंद्र धंगेकर यांना मानणाऱ्या आणि महाविकास आघाडीचा जनाधार असणाऱ्या भागांना भाजपने लक्ष्य केले. तिथे मतांना ‘ब्लॉक’ करण्याची रणनीती आखली;पण पेठांकडे हवे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळे हक्काच्या व्होट बँकेला गृहीत धरणे भाजपला महागात पडले आहे. कारण पक्षांतर्गत नाराजी आणि व्यक्तीविरुद्ध भाजप अशी थेट लढत यामुळे पेठांमधील समीकरणे बदलल्याचा दावा राजकीय अभ्यासकांचा आहे. त्यात पेठांच्या भागात धंगेकर यांनीही मागील निवडणुकांपासून लक्ष दिलेले आहे आणि त्यांना मानणारा वर्गही निर्माण केला आहे. त्यामुळे पक्षीय हेवेदावे बाजूला ठेवून धंगेकर यांना या भागातून अपेक्षित असे मतदान झालेले आहे. एकप्रकारे जिथे काँग्रेस – राष्ट्रवादीला जी अल्प मते पडायची. तिथे धंगेकर यांना मिळालेल्या मतांमुळे आघाडीचा पर्यायाने महाविकास आघाडीचा जनाधार वाढला आहे. दुसरीकडे भाजपचे नेहमीच्या हिंदुत्वाचे कार्ड या खेळीला मतदारांनी थारा दिलेला नाही. एकप्रकारे या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आता भाजपच्या मतदारांमध्ये दोन गट पडल्याचे अधोरेखित होत आहे. याकडेही राजकीय जाणकार लक्ष वेधत आहे. दुसरीकडे पूर्व भागांना टार्गेट करण्याची खेळी मात्र भाजपवर उलटली आहे. धंगेकर यांचे पॉकेट व्होट कसे रोखता येईल यावर लक्ष केंद्रीत केले गेले मात्र पक्षीय हेवेदावे बाजूला ठेवून भाजपचे डावपेचाचे बिंग भाजपमधूनच फोडले गेले. ज्यातून भाजप कुठल्या थराला गेला हे आपसूक जनतेवर बिंबवले गेल्याने त्याचा फटका महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना बसला आहे.
राज्यात लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात लहान असलेल्या कसबा मदारसंघात धंगेकर यांच्याविरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ४० स्टार प्रचारक अशी फौज प्रचारात उतरली आणि त्यांनी पूर्व भागालाच टार्गेट केले. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम मतदानातून भाजपाला भोगावा लागला आहे. शिवाय हक्काच्या पेठांकडे दुर्लक्ष केल्याने अंतर्गत नाराजीचा फटका मतदानातून बसला आहे. त्यामुळेच भाजपचे लीड किती असेल, हा प्रश्न यंदाच्या निवडणुकीत ‘हद्दपार’ झाला आहे आणि अटीतटीच्या लढतीत कसब्याचा आमदार ठरणार हा दावाही फोल ठरला आहे. शिवाय साम-दाम-दंड-भेद याचा अवलंब करून मतदारांमध्ये पक्षाप्रती असणारी प्रतिमा आणि विश्वासाहर्ता यालाही कुणामुळे तडे गेले यावर आता भाजपला विचारमंथन करणे अपरिहार्य आहे.
-प्रविण पगारे