पुणे।महायुतीसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kasba Assembly By-Election) मतदान पार पडले.पैसे वाटपावरून नैतिकतेचा दाखला देणाऱ्या भाजपचे ( BJP)बिंगही पक्षाचे माजी नगरसेवक – पदाधिकाऱ्यांच्या पैसे वाटपाच्या व्हायरल व्हिडीओवरून फुटले.त्यात प्रचारात प्रारंभीपासून महायुतीला जेरीस आणणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (Chief Minister Eknath Shinde) भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर (BJP leaders Chandrakant Patil and Praveen Darekar)यांच्यावरच ठपका ठेवला आहे. प्रचार संपल्यानंतर पोलीस बंदोबस्तात रात्री ८ पर्यंत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर हे फिरत होते. मुख्यमंत्री शिंदे हेही मतदारांना पैसे वाटप करत फिरत होते असा आरोप केला आहे.परिणामी या आरोपामुळे महायुतीची पर्यायाने भाजपची प्रतिष्ठाच धोक्यात आली आहे.
अवघ्या राज्याचे या पोटनिवडणुकीकडे लक्ष लागलेले असताना मतदानानंतरही येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी मतदान करताना पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे घातल्याने त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर मतदारांना पैसे वाटप आणि मारहाण प्रकरणी माजी सभागृहनेता गणेश बिडकर,विष्णू हरिहर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. अशातच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधातही आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शनिवारी ( २५ फेब्रुवारी ) कसबा पेठेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. त्यानंतर ते उपोषणास बसले होते. आचारसंहिता सुरु असताना कसबा गणपती समोर उपोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच आता रवींद्र धंगेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी म्हटले की, प्रचार संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री ८ वाजेपर्यंत पैसे वाटत फिरत होते. चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकरही पोलिसांच्या उपस्थितीत फिरत होते. माझ्यावर गुन्हा दाखल केला, मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. हा पक्षपातीपणा कशाला करायला हवा.असा संतप्त सवालही केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी ज्या घरात पैसे वाटले, ते घर माझं
मुख्यमंत्र्यांनी ज्या घरात पैसे वाटले, ते घर माझं आहे. पण, निवडणूक यंत्रणा ही भाजपाचे कार्यालय झाले आहे. हेमंत रासनेंनी म्हटले आहे कि, कसबा हा भाजपाचा गड आहे. मात्र, हा जनतेचा गड आहे. ही लढाई धनशक्ती आणि जनशक्तीची होती. जनशक्तीच्या मागे जनता होती. धनशक्तीच्या मागे ज्यांनी पैसे घेतले, ते होते. काही लोकांनी पैसे घेतले आणि मत धंगेकरांना देणार असे सांगितले.त्यामुळे १५ ते २० हजार मतांनी माझा विजय होणार आहे, असा ठाम विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.
पाच वाजेपर्यंत प्रचार संपला पाहिजे. पण, मुख्यमंत्र्यांचा पाच वाजून ७ मिनीटांनी भाषण झाले . त्यावर निवडणूक आयोगामार्फत काहीच भूमिका मांडली गेली नाही किंवा मुख्यमंत्र्यांना नोटीस बजविण्यात आली नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात जाणार आहे, असेही रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.
आता उपमुख्यंमत्री देवेन्द्र फडणवीस यांची कोणती भूमिका?
दरम्यान, भाजपकडून पैसे वाटप होत असल्याची तक्रार करून उपोषण करणाऱ्या रविंद्र धंगेकर यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)यांनी स्टंटबाजीचा ठपका ठेवून मतदारांचा अवमान केल्याचे म्हटले होते मात्र त्यानंतर भाजपचे पदाधिकारीच मतदाराना पैसे वाटप करत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने तसेच माजी नगरसेवक, माजी सभागृहनेता यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने भाजपचीच कोंडी झाली आहे.त्यात आता मुख्यमंत्री हेच पैसे वाटप करत फिरत होते असा ठाम दावा धंगेकर यांनी केल्याने भाजपकडून आता कसे प्रत्युत्तर दिले जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यातही उपमुख्यंमत्री देवेन्द्र फडणवीस आता कोणती भूमिका घेतात की सोईस्कर पळवाट काढतात यावर आता चर्चा रंगत आहेत. मात्र या पोटनिवडणुकीत भाजपने विश्वासाहर्ता गमावली असून त्याचे परिणाम आगामी काळात पाहावयास मिळतील.असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.