नागपूर।
भाजपची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात गाजत आहे आणि त्यात केलेले वादग्रस्त वक्तव्य कसे अंगलट येते हेही समोर आलेले आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कोकणात सुरु असलेल्या जनआशीर्वाद यात्रेतील प्रत्येक ॲक्शनला शिवसेनेचे कार्यकर्ते रिॲक्शन देणारच असा इशारा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अप्रत्यक्ष नारायण राणे यांना दिला आहे. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड झालेल्या बैठकीचेही त्यांनी स्वागत केले आहे.
नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुणीही चुकीचे वक्तव्य केले तर ते शिवसैनिक कदापि खपवून घेणार नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमच्यासाठी दैवताप्रमाणे आहेत.जर कुणी अपशब्द काढले तर जशास तसे उत्तर देण्यासाठी आमचे शिवसैनिक तयार आहेत. कोकणातील जनआशीर्वाद यात्रेतील प्रत्येक ॲक्शनला शिवसेनेचे कार्यकर्ते रिॲक्शन देणारच. मुंबईत नारायण राणे यांच्या घरासमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी घातलेला राडा हा भावनांचा उद्रेक होता असेही त्यांनी ठणकावून सांगताना अप्रत्यक्ष केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.