‘ही लोकभावना नव्हे तर राजकीय ‘खेळ’च!
मुंबई
राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलल्यावरून शिवसेनेने सामनातून केंद्रातील मोदी सरकारवर आसूड ओढले आहेत. या पुरस्काराचे नाव बदलून त्याला मेजर ध्यानचंद यांचे नाव देणे ही लोकभावना नसून हा राजकीय खेळ म्हणावा लागेल. असे अग्रलेखात म्हटले आहे. राजीव गांधींच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता आला असता याकडेही अग्रलेखातून लक्ष वेधण्यात आले आहे.
सध्या देशाचे वातावरण खेळमय झाले आहे. एरवी ते क्रिकेटमय झालेले दिसते. टोकियो ऑलिपिंकमध्ये देशात इतर खेळांवर उत्साहाने चर्चा होत असताना नीरज चोप्रा याने भालाफेकीत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. या सुवर्ण क्षणांचा उत्सव सुरू असतानाच केंद्र सरकारने राजकीय खेळ केला. पण या राजकीय खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत . खेल रत्न हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. 1991- 92 सालापासून राजीव गांधींच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय. अनेक महान खेळाडूंना आतापर्यंत हा पुरस्कार प्रदान केला गेला आहे. पण राजीव गांधी यांचे नाव असलेला पुरस्कार नको असे यापैकी कोणीही म्हटल्याचे दिसत नाही. त्यामुळे टोकियो ऑलिपिंकमध्ये भारतीय हॉकी संघास ब्रॉंझपदक मिळताच मोदी सरकारने राजीव गांधींचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण करणे हे अनाकलनीय आहे.
राजीव गांधीचे नाव नको म्हणून ध्यानचंद यांचे नाव देणे हे द्वेषाचे राजकारण आहे. ध्यानचंद यांच्या नावाने आणखीन एक मोठा पुरस्कार घोषित करता आला असता. तसे झाले असते तर मोदी सरकारची वाहवा झाली असती.
आता भाजपमधील राजकीय खिलाडी असे सांगत आहेत की, राजीव गांधी यांनी कधीही हातात हॉकीचा दांडा धरला होता काय ?हा त्यांचा प्रश्न वाजवी आहे; पण अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदींच्या नावाने केले. श्री मोदी यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी पार पाडली किंवा अरुण जेटली यांच्या नावाने दिल्लीत असे नामकरण केले. तेथेही तोच निकष लावता येईल असा प्रश्न लोक आता विचारत आहेत. फुटबॉल सारख्या खेळांचे प्रशासन आज गैर खेळाडूंच्या जातात गेले आहे. हे कसले लक्षण म्हणायचे ? जे मोदी सरकार आज ऑलम्पिक पदकांचा उत्सव साजरा करीत आहे. त्या मोदी सरकारने गेल्या काही वर्षात ऑलिंपिकचे बजेट साधारण तीनशे कोटींनी कापले यावरही सामनाच्या अग्रलेखातून बोट ठेवण्यात आले आहे.

आज स्वर्गात मेजर ध्यानचंद यांनाही तसे वाईटच वाटले असेल!
देशाच्या प्रगतीत मोठे योगदान असणाऱ्या पंतप्रधानांचे बलिदान हा चेष्टेचा विषय ठरू शकत नाही. राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे नामकरण करणे ही लोक भावना नसून हा तर राजकीय खेळ म्हणा लागेल. राजीव गांधी यांच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता आला असता. भारताने ती परंपरा व संस्कृती गमावली आहे. आज स्वर्गात मेजर ध्यानचंद यांनाही तसे वाईटच वाटले असेल!