सत्ता असूनही आमदारांच्या प्रस्तावावर निर्णय नाही
पुणे|
आगामी महापालिका निवडणुकीत शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा भाजपला चांगलाच महागात पडण्याची चिन्हे असताना भाजपमध्ये मात्र श्रेयाचे राजकारण सुरु झाल्याचे चित्र कसबा विधानसभा मतदारसंघातील शिवाजी रस्त्याच्यासंदर्भातील एका प्रस्तावामुळे अधोरेखित झाले आहे. विशेष म्हणजे पालिकेत सत्ता असतानाही भाजपच्या विद्यमान आमदारांनी दिलेल्या प्रस्तावालाच पुढे ढकलण्यात आल्याने भाजपमध्ये आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी ,शहरातील शिवाजी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 1 कोटी रुपयांचे वर्गीकरण करावे, असा प्रस्ताव भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समिती समोर ठेवला होता ;पण स्थायी समितीने हा प्रस्ताव दोन महिने पुढे ढकलला. परिणामी त्यावर पुढील आर्थिक वर्षातच निर्णय होणार आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहरातील विशेषतः मध्यवर्ती पेठांमधील पर्यायाने कसबा विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून भाजपला लक्ष्य करण्यात येत आहे आणि विकासकामांमधील अनागोंदी कारभाराचे पोलखोल करण्याची मोहीम सुरु असताना दुसरीकडे पालिकेत सत्ता हातात असूनही भाजपच्या आमदारांनी मतदारसंघातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी दिलेल्या प्रस्तावाला थेट पुढची तारीख मिळते. तेही पालिका निवडणूक पार पडल्यानंतर प्रस्तावावर निर्णय घेण्याच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कसबा विधानसभा मतदार संघातील आणि प्रभाग 15 क मधील शिवाजी रस्त्याचे डांबरीकरण करावे, या कामासाठी 1 कोटीचे वर्गीकरण करावे, असा प्रस्ताव भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. वर्गीकरणाच्या माध्यमातून ही रक्कम उपलब्ध करून देण्याची मागणी टिळक यांनी केली होती. अंदाजपत्रकात सारस बाग ते अप्पा बळवंत चौक उड्डाणपुल बांधण्यासाठी 1 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. ही तरतूद या रस्त्यासाठी द्यावी, असे प्रस्तावात म्हटले होते. शिवाय मुख्य सभा मान्यता देईल, या भरवश्यावर आयुक्तानी या ठरावाची कार्यवाही करावी. असेही यात नमूद केले होते. मात्र स्थायी समितीने हा प्रस्ताव दोन महिने पुढे ढकलला. त्यामुळे पालिका निवडणुकीला सामोरे जाताना या रस्त्याच्या विकासाचे श्रेय कुणाला यासह कसबा विधानसभा मतदारसंघासाठी आगामी दावेदार कोण यावरून भाजपमध्ये या प्रस्तावाच्या निमित्ताने दोन गटांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे का यावरून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. त्यात या मतदारसंघात आता परिवर्तन हवे असा गजर भाजपमध्ये सुरू झाला असून अनेकांनी पक्षातील दुसऱ्या गटाला आपलेसे केले आहे. त्यामुळे या अंतर्गत कलहातून विद्यमान आमदारांचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला का, त्यातून कोणाला शह दिला गेला यावरच राजकीय वर्तुळात चर्चेचे गुऱ्हाळ रंगले आहे.