नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ट्विटर अकाऊंट अखेर अनलॉक करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या सहीत काँग्रेसच्या इतर नेत्यांचेही ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरळीत करण्यात आले आहे. देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याची टीका झाल्याने ट्विटरकडून कारवाई मागे घेण्यात आली आहे.
काँग्रेसचे सर्व अकाऊंट अनलॉक करण्यात आली आहेत. मात्र यासाठी ट्विटरकडून कोणतेही कारण देण्यात आलेले नाही, अशी माहिती काँग्रेसचे सोशल मीडिया अकाउंट इन्चार्ज रोहन गुप्ता यांनी दिली आहे.
दिल्लीत बलात्कार करून हत्या झालेल्या नऊ वर्षाच्या पीडितेच्या कुटुंबाचे फोटो ट्विट केल्यानंतर ट्विटरने राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांचे ट्विटर अकाऊंट बंद केले होते. असे फोटो शेअर करणे नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते. मात्र राहुल गांधी यांनी ट्विटरवर आरोप करताना देशाच्या राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात असल्याचे म्हटले होते. तसेच हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला असल्याची टीका केली होती. त्यानुसार लगेच ट्विटरकडून कारवाई मागे घेण्यात आली आहे.
