सातारा। कुणी कितीही म्हटले तरी हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. भविष्यात एकत्र लढलो तर आगामी पाच वर्षे देखील राज्यात आघाडी सरकारच सत्तेवर राहील असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
महाबळेश्वर येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर पार पडले. या शिबीराच्या समारोपासाठी शरद पवार हे महाबळेश्वर येथे आले होते. शिबीराला जाण्यापूर्वी शासकीय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील व आमदार मकरंद पाटील उपस्थित होते.यावेळी पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना आता काही काम उरले नाही. त्यामुळे त्यांनी आता भाकीत व्यक्त करण्याचा व्यवसाय सुरु केला असावा. कुणी कितीही म्हटले तरी हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारच असेही ते म्हणाले. एसटीमध्ये आता कोणती संघटना अधिकृत आहे याचा निर्णय झाला पाहीजे. विलीगीकरणाचा करार कोणाबरोबर करायचा हे देखील अद्याप स्पष्ट झाले नाही. या कर्मचाऱयांच्या आंदोलनामुळे विरोधकांना देखील हे प्रकरण पेटवण्याची आयती संधी मिळाली आहे, अशी टिकाही शरद पवार यांनी केली. सातारा जिल्हा बँकेची निवडणूक ही आघाडी करून लढवली नाही. सर्व उमेदवार हे स्वतंत्र उभे राहीले होते. काही उमेदवार हे सहकार पॅनेलच्यावतीने निवडणूक लढवत होते. लोकशाहीत प्रत्येकाला स्वायत्ता आहे. त्यामुळे आलेला निकालही त्यांनी स्विकारला पाहीजे, असे शरद पवार एका उत्तरात म्हणाले.