अमरावती
महाराष्ट्रात विकास करण्याऐवजी राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कुरघोडीचे राजकारण करत आहे. सत्तेत असणाऱ्या या तिन्ही पक्षांचे एकमेकांसोबत पटत नाही. त्यामुळे ते जनतेचे काही भले करू शकत नाही. जर शिवसेनेला टिकायचं असेल तर अजूनही वेळ आहे. भाजपशी युती हाच पर्याय आहे. असे प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.
रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमरावतीत आलेल्या रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवं होतं. आता अडीच वर्ष पूर्ण झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला बाजूला सारून भाजपशी युती करावी. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडाला अडीच वर्षे पूर्ण होताच पुढील अडीच वर्ष देवेंद्र फडणीस यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळायला हवी. शिवसेनेसाठी हा योग्य निर्णय ठरेल. वाटलं तर दोन्ही पक्षात मध्यस्थी करण्यासाठी माझी तयारी आहे, असेही ते म्हणाले.
