पुणे|आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर निवडणूक लढायची असेल तर विद्यमान वगळता अन्य प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार आणायचे कुठून या पेचात सद्यस्थितीत शहर काँग्रेस अडकली असून तेच यंदा काँग्रेसपुढे आव्हान राहणार आहे.परिणामी यातून मार्ग कसा काढायचा याच विवंचनेत काँग्रेसचे स्थानिक नेते असल्याचे चित्र आहे.
आगामी पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार प्रदेशाध्यक्षांनी केला असला तरी त्यामागे पुण्यात आगामी काळात काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी हा एक रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रदेशाध्यक्षांच्या या भूमिकेवरून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची मोठी पंचाईत झाली आहे.
येत्या पालिका निवडणुकीत तीन सदस्यांच्या प्रभाग पद्धतीत सद्यस्थितीत दहा विद्यमान वगळता अन्य प्रभागांसाठी सक्षम उमेदवार शोधायचे कसे या प्रश्नाला काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. याच स्थानिक पदाधिकारी वजा नेत्यांनी महाविकास आघाडीतूनच निवडणुकीला सामोरे जाण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि तीच अपेक्षा बाळगून होते. मात्र प्रदेशाध्यक्षांनी पुणे शहर काँग्रेसला नवऊर्जा देण्याबरोबरच पक्षसंघटनात्मक बांधणीसाठी स् वबळाची भूमिका कायम ठेवली आहे.
त्यामुळे आता काँग्रेसच्या गोटात त्यानुसार हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र त्याला हवा तसा जोर नाही. त्यात कार्यकर्त्यांची फौज कशी उभारावी हा प्रश्न स्थानिक नेत्यांना भेडसावत आहे. त्यातही हजारी प्रमुख संकल्पना राबवून एकेकाळी शहरावर वर्चस्व असलेल्या काँग्रेसला पालिका काय शहर पातळीवरील स्थानिक नेतेवजा पदाधिकाऱ्यांमधील अहंकाराचा फटका बसत आहे.
निवडणुका आल्या कि, तिकीट वाटपात स्वतःचे आणि सग्यासोयऱ्यांचे हित जोपासण्यासाठी एकत्र यायचे नंतर कुरघोड्यांचे राजकारण करत एकमेकांकडे पाठ फिरवयाची असा कारभार स्थानिक नेत्यांमध्ये सुरु आहे. मग काँग्रेसला गतवैभव कसे मिळणार हाच सवाल कार्यकर्त्यांचा असून गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली याकडेही लक्ष वेधले जात आहे.स्वतःपुरते पाहणाऱ्या स्थानिक नेत्यांनी गत निवडणुका या ‘सेटलमेंट’ करूनच लढल्या.असा आरोपही काँग्रेसच्या वर्तुळात कार्यकर्त्यांकडून होत आहे.
त्यामुळे प्रदेशाध्यक्षांकडून शहरातील इच्छुकांची नावे पाठवा असे आदेश आल्याने,त्यातही सक्षम उमेदवारांचा शोध प्रदेश स्तरावरून घेता येईल हे आग्रहाने नमूद केल्याने शहरातील स्थानिक नेत्यांचे धाबे दणाणले आहे. पालिकेतील विद्यमान माननीय वगळता १६२ उमेदवार , प्रभाग निश्चित झालेले नसताना आणि पक्षातील काही जण पक्षालाच ‘हात’ दाखवण्याच्या तयारीत असताना शोधायचे तरी कसे याच प्रश्नांनी स्थानिक नेत्यांना धडकी भरली असून, यंदाच्या निवडणुकीचे सूत्रे हातात राहणार नाहीत, यामुळेही ते बैचेन झाल्याची कुजबुज काँग्रेसच्या वर्तुळात होत आहे.