एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही असताना देशाचा कारभार लोकाभिमुख आणि पारदर्शक असावा या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून राज्यात भाजपतर्फे जनआशीर्वाद यात्रेला प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र वाढते पेट्रोल -डिझेलचे दर, महागाईचा आगडोंब, घरगुती गॅस सिलेंडरचे भडकलेले दर या पार्श्वभूमीवर या जनआशीर्वाद यात्रेला कसा किती प्रतिसाद मिळतो? त्यावरून राजकीय आखाड्यात कोणते पडसाद उमटतात याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार राबविल्या जाणाऱ्या या जनआशीर्वाद यात्रेची महाराष्ट्राची जबाबदारी भाजपकडून आमदार संजय केळकर यांच्याकडे देण्यात आली आहे. सोमवारपासून सुरू झालेली ही यात्रा २० ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या यात्रेदम्यान भाजपचे नेते सामान्य नागरीक व ग्रामस्थांशी संवाद साधून विविध योजनांचा आढावा घेणार आहेत.शेतकरी, भूमिपुत्र, मच्छिमार, दिव्यांग व लाभार्थी, व्यावसायिक व व्यापारी यांच्याशी संवाद साधणार आहेत तसेच भाजपचे समर्थ बूथ अभियान, स्वच्छता अभियान आदी विविध कार्यक्रम या यात्रेच्या निमित्ताने होणार आहेत. जास्तीत जास्त समाजघटकांना या यात्रेत जोडून घेत नागरीक व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्याचा उद्देश आहे. या यात्रेत भाजपचे जिल्हास्तरीय आणि स्थानिक पातळीवरील नेतेही सहभागी होणार आहेत.मात्र यात्रेच्या प्रारंभीच राज्यसरकारवर लसींच्या पुरवठ्यावरून टीका करण्यास भाजपच्या काही नेत्यांनी प्राधान्य दिल्याने त्याला महाविकास आघाडी सरकारकडून कसे प्रत्युत्तर मिळते.हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. त्यात या जनआशीर्वाद यात्रेकडे राजकीय दृष्टीने पाहू नये असे आवाहनही भाजपच्या गोटातून करण्यात आल्याने या यात्रेला नागरिक कसा प्रतिसाद देतात हा भाग महत्वाचा आहे. त्यातही भाजपचे समर्थ बूथ अभियानालाच गती देण्यासाठी ही यात्रा असल्याची चर्चा आहे.