मुंबई।
राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा आता सुटण्याची चिन्हे आहेत. राज्यपालांनी १ सप्टेंबरची वेळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिल्याने १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग सुकर होतो कि, आणखी बिकट हे १ सप्टेंबरलाच स्पष्ट होणार आहे.
राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकार पुन्हा सक्रिय झाली आहे. या आमदारांच्या नेमणुकीसाठी आठ महिन्यापूर्वीच पत्र महाविकास आघाडी सरकारने दिले होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार होते मात्र राजभवनाकडून त्यांना वेळ मिळाली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी राजभवनात जाऊन संपर्क साधला. त्यावेळी राज्यपाल हे पुढील चार दिवस कामानिमित्त महाराष्ट्राच्या बाहेर असल्याने राज्यपालांकडून १ सप्टेंबरची वेळ महाविकास आघाडी सरकारला देण्यात आली आहे. त्यानुसार आता महाविकास आघाडी सरकारचे नेते १ सप्टेंबरला राज्यपालांची भेट घेणार आहेत. यापूर्वी पत्र देऊनही राज्यपालांनी कोणताही निर्णय न घेतल्याने राज्यसरकारने हे प्रकरण उच्च न्यायालयात नेले होते. न्यायालयानेही लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निरीक्षण नोंदवले होते. तर या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राज्यपालांवर टीका केली होती. काँग्रेसनेही या प्रश्नी आवाज उठवला होता. आता राज्यपाल कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.