जी -२० परिषद पुण्यात होत आहे, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. मात्र, या परिषदेसाठी आजी- माजी खासदार, आमदार, माजी महापौरांना परिषदेतील चर्चा ऐकण्यासाठी निमंत्रित करणे आवश्यक होते. शहराच्या विद्यमान खासदार गिरीश बापट यांनाही परिषदेचे निमंत्रण नाही, हे खेदजनक आहे, असे वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख उपस्थित होते.
जी- २० परिषदेसाठी पुण्याला संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे. परिषदेच्या निमित्ताने विविध विषयांवर चर्चा होणार आहे. जी-२० परिषदेसाठीचे विषयही महत्त्वाचे आहेत. संसदेत यापूर्वी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडण्यात आली होती. मात्र पुण्यात होत असलेल्या परिषदेसाठी आजी-माजी खासदार, आमदार, माजी महापौर यांना डावलणे योग्य नाही. परिषदेसाठी व्यासपीठावर निमंत्रित करावे, अशी मागणी नाही. मात्र चर्चा ऐकण्याची संधी मिळण्यास काेणती अडचण होती, असा सवालही वंदना चव्हाण यांनी केला आहे. पुण्याचे महापौर असताना महापालिकेच्या कार्यक्रमासाठी तेव्हा शहरातील सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांना निमंत्रित करून सातत्याने बैठका घेतल्या होत्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.(G-20 Conference: People’s representatives upset at being sidelined)
सुशोभीकरण;पण निधीचा अपव्यय
वंदना चव्हाण म्हणाल्या की, जी-२० परिषदेसाठी शहर सुशोभीकरण केले जात आहे. मात्र, नागरिकांच्या करातून जमा झालेल्या निधीचा अपव्यय महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.