कोल्हापूर। पर्यावरण अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी राज्यात उद्भवणाऱ्या पूरप्रश्नावरून थेट माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनाच दोषी ठरवले आहे. शिवाय फडणवीस यांनाच पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक कळलाच नाही,त्यामुळेच निळ्या व लाल रेषेतील बांधकामांना सरसकट परवानगी दिली गेली. परिणामी पश्चिम महाराष्ट्रात महापुराची तीव्रता वाढली आहे,हेही त्यांनी ठामपणे मांडले.
कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला.त्यातूनच नागरिकांना पुराचा फटका सहन करावा लागत आहे. पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळाला नाही. त्यामुळे त्यांनी क्रिडाईने पूर रेषेसंदर्भात दिलेला अहवाल स्विकारला. शिवाय निळा आणि लाल रेषेतील बांधकामांना सरसकट सूट दिली. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पुराचा सामना करावा लागत असून गेल्या दोन-तीन वर्षांपासून महापूराची तीव्रता वाढली आहे. या सर्वाला पूररेषेच्या बाबतीत बेजबाबदारपणे निर्णय घेणारे देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. त्यामुळे किमान आतातरी पूर रेषेची नव्याने आखणी केली पाहिजे अशी मागणीही मेधा पाटकर यांनी केली.