farmers protest Prime Minister Narendra Modi has announced the repeal of all the three agricultural laws

शेतकऱ्यांचा प्रहार,  शतप्रतिशत… मोदी सरकारची हार ! 

शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाला मोठं यश
थोडक्यात आढावा…
 पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी  देशाला संबोधन करताना तिन्ही कृषी कायदे रद्द  करण्याची घोषणा केली आहे. अनेक दिवसांपासून दिल्लीतील सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे   हे यश असले तरी  केंद्र सरकारने मागे घेतलेल्या  या  मोठा निर्णयामागे मोदी सरकारला आगामी सत्तेची चिंता असल्याचेच अधोरेखित झाले आहे. आम्ही  शेतकऱ्यांना समजावून सांगण्यास कमी पडलो,असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले असले तरी गेले वर्ष – दीड   आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आंदोलनस्थळी पंतप्रधान मोदी का भेटले नाहीत ? हा प्रश्नही विसरून चालणार नाही. आगामी निवडणुका हेरूनच हे तीन कृषी कायदे मागे घेण्याचे जाहीर केले अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात झडत असली तरी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत यांनी नुकताच दिलेला इशाराही दुर्लक्षून चालणार नाही. संसदेपासून देशातील प्रत्येक सरकारी कार्यालय लक्ष्य करू असा इशारा होता. त्यामुळे हे घडले तर काय ? या पेचात मोदी सरकार अडकले का ? आणि त्यातून हा निर्णय घेतला का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. असे असले तरी मोदी सरकार ‘बॅकफूट’ गेले हे एकप्रकारे भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. ज्या आणाभाका घेऊन हे सरकार सत्तेवर आले, त्यातील एकाचीही पूर्तता आजमितीस झालेली नाही,हे वास्तव आहे. लोकशाहीत ‘ हुकूमशाही’चे खुले दर्शन घडवणाऱ्या या मोदी सरकारला कृषी कायद्यावरून आंदोलनाचे सातत्य टिकवून ठेवणाऱ्या अन्नदात्या बळीराजाने वठणीवर आणले आहे,असाच  निष्कर्ष  निघत आहे.
 केंद्र सरकारने तीन कृषी विधेयक संसदेत पारित केले होते. त्यावर २७ सप्टेंबर २०२० रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी   केल्यानंतर त्याचे रूपांतर कायद्यात झाले. गेल्या दीड वर्षापासून शेतकरी या कायद्यांचा विरोध करत होता. ४० प्रमुख शेतकरी संघटनांसह   देशभरातील सुमारे ५०० शेतकरी संघटना आणि हजारो शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. याकाळात अनेक अनुचित घटना घडल्या. तसेच विविध प्रकारचे आंदोलन, मोर्चा आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

१७ सप्टेंबर २०२० ला संसदेत कृषी विधयेक  मंजूर  झाली. तिन्ही कायद्यांचा शेतकऱ्यांनी विरोध नोंदवला. यात प्रामुख्याने पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश आणि दिल्लीतील शेतकऱ्यांचा समावेश होता. उत्तरप्रदेश, पंजाब आणि हरयाणातील काही शेतकरी संघटनांनी या कायद्यांना जोरदार आव्हान  देत  केंद्र सरकारला कायदे तात्काळ मागे घेण्यास सांगितले. मात्र  केंद्र सरकारकडून   कोणत्याही हालचाली होत नव्हत्या. परिणामी  जंतर मंतरवर  आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्यास सरकारने परवानगी नाकारली. बुरारी येथील मैदानावर सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन करावे, असे पोलिसांनी आवाहन केले. मात्र, जंतरमंतरवरच आंदोलन करण्यावरून शेतकरी ठाम राहिले. तोपर्यंत हरयाणा आणि दिल्लीमधील सिंघू आणि टिकरी येथील सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा झाले आणि तेथेच धरणे आंदोलन सुरू केले. त्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमा अडवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी हजारोच्या संख्येने दिल्लीच्या सीमांकडे शेतकऱ्यांनी कूच केली. त्यानुसार दिल्लीला जोडणाऱ्या बहुतांश सीमांवर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. शेतकरी आपल्या परिवारासोबत सीमांवर दाखल होत होते. त्यांची जेवणाची, आंघोळीची आणि राहण्याची व्यवस्था देखील सीमांवरच करण्यात आली होती. जोपर्यंत कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत याठिकाणाहून हटणार नसल्याचा संकल्प शेतकऱ्यांनी केला.

खलिस्तानी…  पाकिस्तानी, देशद्रोही 

कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर त्यांना विविध नावं ठेवण्यात आले. सुरूवातीला या आंदोलनाला सरकारकडून महत्त्व देण्यात आले नाही. मात्र  दिल्लीतील सीमांवर वाढती गर्दी आणि सोशल मिडियावर मिळणारी प्रसिद्धी बघून  या आंदोलनाला देशद्रोही  ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. आंदोलनातील शेतकऱ्यांवर  खलिस्तानी, पाकिस्तानी, देशद्रोही तसेच चीनकडून मिळालेली फूस असे आरोप करण्यात आले. आरोप करणाऱ्यांमध्ये केंद्रीय मंत्र्यापासून ते बडे नेते होते. मात्र शेतकऱ्यांनी देखील या आरोपांचा तितकाच प्रतिकार करत आंदोलन सुरूच ठेवले.

 ट्रॅक्टर परेड…     

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच होते. शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये चर्चेच्या सात फेऱ्या  पार पडल्या ;पण  कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे २६ जानेवारीला दिल्लीमधील प्रजासत्ताक दिनाची  परेड झाल्यानंतर, आम्ही ट्रॅक्टर परेडचे आयोजन करु असा इशारा शेतकरी संघटनांनी तीन जानेवारीला दिला होता. त्यानुसार ट्रॅक्टर मोर्चामध्ये देशभरातील हजारो शेतकरी सहभागी झाले. पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान यांसह इतर राज्यांमधील शेतकरीही या मोर्चासाठी दिल्लीमध्ये दाखल झाले. प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेडची सुरुवात शांततेत सुरू झाली. मात्र या परेडला दुपारनंतर गालबोट लागले. शहरात ठिकठिकाणी काही आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडत हिंसाचार सुरू केला. त्यातच काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर   चढत, तेथे आपला झेंडाही फडकवला होता. यामध्ये अनेकजण जखमी देखील झाले.शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय कलाकारांनी देखील पाठिंबा देत कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. यामध्ये पॉप सिंगर रिहाना , प्रसिद्ध यूट्यूबर लीली सिंह , सामाजिक कार्यकर्ती ग्रेथा थमबर्ग   याशिवाय अनेक कलाकारांनी ट्विटरवर आंदोलनाला पाठिंबा दिला.

  ‘ब्लॅक डे’ला देशात उत्स्फूर्त प्रतिसाद  

२० मे रोजी संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) २६मे ला ‘ब्लॅक डे’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार देशभरातील शेतकऱ्यांनी याला पाठिंबा दर्शवला. शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी, त्यांच्या ट्रॅक्टरवर किंवा इतर वाहनांवर काळे झेंडे फडकावून सरकारचा निषेध नोंदवला. तसेच आंदोलनस्थळी सरकारचे प्रतिनिधित्व करणारे पुतळेही शेतकऱ्यांनी जाळले. यावेळी शेतकरी व पोलीस यांच्यात संघर्ष   झाला होता. 

कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारवर दबाब वाढावा म्हणून विरोधकांनी देखील लॉबिंग सुरू केली. आंदोलनकाळात केंद्र सरकारचे तीन अधिवेशन झालेत. या सर्व अधिवेशनांमध्ये कृषी कायदे रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. संसदेचे  कामकाज बंद करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र्य अधिवेशन बोलावण्याची देखील मागणी करण्यात आली होती. त्यामुळे केंद्र सरकार बॅकफूटवर गेले.

अनेक राज्यांचा विरोध… 

शेतकऱ्यांचा कृषी कायद्यांना विरोध पाहून विरोधी पक्ष सत्तेत असलेल्या राज्य सरकारने देखील कृषी कायदे लागू करणार नसल्याचे जाहीर करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला. शिवाय केंद्र सरकारचा देखील निषेध नोंदवला. अनेक राज्यात आंदोलने करण्यात आली. यामध्ये बैलगाडी मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा, जेलभरो आंदोलन, राजभवनाला घेराव घालणे यासारख्या आंदोलनाचा समावेश होता.

लखीमपूर खैरी हत्याकांड…  

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे लखीमपूर खैरी येथे येणार होते. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी हेलिपॅडला घेराव घातला. दरम्यान, केशव मौर्य हे आपला कार्यक्रम संपवून केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तेनी यांच्या घराकडे रवाना झाले. याची माहिती मिळताच अजय कुमार यांचा मुलगा घाईघाईत घरी जायला निघाला. त्याच्या गाडीचा ताफा तिकोनिया येथील बनबीरपुर चौकात पोहोचताच तेथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी न थांबवता ती थेट शेतकऱ्यांच्या अंगावर चढवण्यात आली. यात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *