नागपूर।
निधीसाठी मी आक्रमकपणे मागणी करते, अर्थमंत्री अजित पवार हे जरी आक्रमक असले तरी ते मवाळ आहेत. आम्ही हट्ट केला की, निधी मिळतो. अशी प्रतिक्रिया महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. निधीवाटपात काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या मंत्रालयांना डावलले जात असल्याच्या चर्चाही फेटाळून लावली आहे.
ऊर्जा मंत्रालयाला निधी मिळत नसल्याची तक्रार राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत ( Energy Minister Dr. Nitin Raut ) यांनी केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मंत्रालयांनाच निधी कमी दिला जात असल्याचा सूर मंत्र्यांमध्ये उमटू लागला आहे.
या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur ) यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, निधी मिळवण्याची मागणी मी आक्रमकपणे रेटून धरत असते. त्यामुळे मला अद्याप तरी तसा अनुभव आलेला नाही. अर्थमंत्री अजित पवार ( Finance Minster Ajit Pawar ) आक्रमक असले तरी ते स्वभावाने मवाळ आहेत. आम्ही हट्ट केला की निधी मिळतो. यानंतर जरी काही अडचण आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असल्याचेही त्या म्हणाल्या.
ऊर्जामंत्रालयाला अर्थ व नियोजन मंत्रालयाकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारीवरून राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांना पत्राद्वारे परिस्थितीची माहिती दिली आहे. मात्र नितीन राऊत यांनी लिहिलेल्या पत्रानंतर काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मंत्रालयांना निधी वाटपात डाववले जात असल्याची चर्चा रंगली असताना यशोमती ठाकूर यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.