मुंबई । महाराष्ट्रात सत्तांतर होऊन एक महिना लोटला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion of Chief Minister Eknath Shinde’s government)अजूनही झालेला नाही.हा मुद्दा घेऊन विरोधी पक्षासह अनेक राजकीय लोक एकीकडे टीका करत असले तरी या मंत्रिमंडळाबाबत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत काही याचिका न्यायालयातही आहेत. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.त्यात शिंदे गट विरुद्ध शिवसेना याचाही लढा न्यायालयात गेला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. त्यात मंत्रिमंडळ (cabinet)विस्तार झाला तर कोण कोण होणार मंत्री? हा प्रश्न जितका महत्वाचा आहे,त्याहीपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या आमदारांपैकी कितीजणांची मंत्रीपदी वर्णी लागते? शिंदे गटातून महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या आमदारांना संधी मिळणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यात ज्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार नाही,त्यांचा पुढील पवित्रा काय असणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातून कोणाची वर्णी लागेल तर भाजपकडून (BJP) कोणाला संधी दिली जाईल (Eknath Shinde government: This will be the possible cabinet, ‘these’ are strong contenders) याचा घेतलेला हा आढावा.
- संदिपान भुमरे प्रबळ दावेदार
- औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मतदार संघातून संदिपान भुमरे हे सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये रोजगार हमी योजना मंत्री म्हणून पद भूषवलेल्या भुमरे यांचा मतदार संघावर प्रभाव आहे
- एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दादा भुसे
- नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मतदार संघातून निवडून आलेले दादा भुसे हे आमदार आहेत. ते आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जातात. मविआ सरकारमध्ये कृषिमंत्री राहिलेल्या भुसे यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागणार आहे.
- मुलुख मैदानी तोफ गुलाबराव पाटील
- जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार गुलाबराव पाटील हे शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले गुलाबराव पाटील महाविकास आघाडी सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री म्हणून कार्यरत होते.
- उदय सामंत यांचे पारडे जड
- रत्नागिरी मतदारसंघातून विधानसभेवर सलग निवडून येणारे उदय सामंत हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आमदार होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पुन्हा एकदा निवडून येत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काम केले. मतदारसंघात असलेला प्रभाव आणि एकनाथ शिंदे तसेच अन्य नेत्यांशी असलेले त्यांचे जवळचे संबंध हे त्यांना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत.
- शंभुराज देसाईंना पुन्हा संधी
- सातारा जिल्ह्यातील पाटण मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर सातत्याने निवडून येणारे आमदार म्हणजे शंभुराज देसाई. आपल्या विरोधकांना पाणी पाजत त्यांनी मतदारसंघांमध्ये स्वतःचा असा मतदार वर्ग निर्माण केला आहे. मविआमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या देसाई यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी मिळणार आहे.
- अब्दुल सत्तार यांचा करिष्मा
- औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघात अब्दुल सत्तार यांचा करिष्मा आहे. सत्तार या मतदारसंघातून सलग निवडून येत आहेत. याआधी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले सत्तार आता शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, शिंदे यांच्यावर सर्वात आधी निष्ठा दाखवून बाहेर पडल्याचे फळ त्यांना मिळेल अशी शक्यता आहे.
- राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले संजय शिरसाट
- औरंगाबाद मतदार संघातून निवडून येणारे संजय शिरसाट हे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यात आणि त्यांच्यावतीने बाजू मांडण्यात आघाडीवर असलेल्या शिरसाट यांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मिळणार त्यागाचे फळ ?
- अपक्ष आमदार असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला दिलेला पाठिंबा मागे घेत शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला आहे. अपक्ष आमदार म्हणून मंत्रीपद असतानाही केलेल्या त्यागाचे फळ म्हणून त्यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी मिळेल अशी चिन्हे आहेत.
- बच्चू कडूंच्या रूपाने ‘प्रहार’ला प्राधान्य
- प्रहार या संघटनेच्या माध्यमातून गेली तीन विधानसभा निवडून येणारे आमदार बच्चू कडू यांना मंत्रीपद दिले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारवर टीका करत बाहेर पडलेल्या आणि अपक्ष आमदारांचा नेतृत्व करणाऱ्या बच्चू कडू यांना मंत्री केले जाणार असल्याची माहिती खात्रीशीर आहे.
- भाजपकडून हे असतील संभाव्य मंत्री:
- केंद्रीय नेतृत्वाजवळ असणारे चंद्रकांत पाटील
- पुणे जिल्ह्यातील कोथरूड विधानसभेचे आमदार असलेले चंद्रकांत पाटील मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र, पुणे पदवीधर मतदार संघातून त्यांनी दोनवेळा विधान परिषदेवर विजय मिळवला होता. राज्याचे महसूल मंत्री म्हणून काम केलेल्या चंद्रकांत पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रीपदी वर्णी लागण्याची चर्चा आहे.
- पहिल्या टप्प्यात गिरीश महाजन
- जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदार संघातून सलग पाचवेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून येत असलेल्या गिरीश महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून युती सरकारमध्ये काम पाहिले आहे. पक्षाच्या विविध पदांची जबाबदारी स्वीकारत पक्षासाठी अनेक मोठी आव्हाने त्यांनी स्वीकारली आहेत. अलीकडच्या काळात पक्षाची एक प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख असून त्यांना पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाणार आहे.
- वाकचातुर्य असलेले सुधीर मुनगंटीवार
- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदार संघातून सातत्याने निवडून येणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी युती सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच, पक्षातील वरिष्ठ नेत्यांची जुळवून घेणे आणि अत्यंत वाकचातुर्य असलेल्या मुनगंटीवार यांचा समावेश होणे निश्चित मानले जात आहे.
- महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय कुटे
- बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघातून निवडून आलेले आमदार संजय कुटे यांना यावेळी मंत्रिमंडळात नक्की स्थान मिळेल अशी चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन करण्यामध्ये यांनी महत्त्वाची भूमिका बजावली यामुळे कुटे यांचा समावेश निश्चित मानला जातो आहे.
- पक्षातील कामाची पोचपावती मिळणार आशिष शेलारांना
- मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदार संघातील आमदार आशिष शेलार यांनी आपल्या मतदारसंघावर मोठा प्रभाव पडला आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेच्या झालेल्या गत निवडणुकीमध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष म्हणून मोलाची कामगिरी बजावत पक्षाला यश मिळवून दिले होते. राष्ट्रीय स्तरावरील अनेक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या शेलार यांनी युती सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या पक्षातील कामाची पोचपावती म्हणून त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
- खडसे – तावडेंना ‘दूर’ लोटणारे फडणवीसांचे ‘पीए’ अभिमन्यू पवार
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अभिमन्यू पवार त्यांचे स्वीय सहायक होते. फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे ते मानले जातात. फडणवीस यांनी पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून इतर पक्षातील मोठ्या नेत्यांनाही भाजपमध्ये प्रवेश दिला. तर एकनाथ खडसे आणि विनोद तावडे सारख्या नेत्यांना दूर लोटले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांना औशामधून उमेदवारी देऊन हा मतदारसंघ चर्चेत आणला होता. अभिमन्यू पवार हे संघाशी निगडीत असून यांचे वडील दत्तात्रय पवार हे संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.
- ओबीसी समाजाचे नेते राम शिंदे
- नगर जिल्ह्यातील माजी मंत्री व भाजप नेते प्रा. राम शिंदे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि ओबीसी समाजाचे नेते आहेत. मंत्री असताना अनेक खाती सांभाळण्याचा अनुभव त्यांच्याकडे असून पक्षात विविध पदांवर कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी कर्जत-जामखेड मतदारसंघातून शिंदे आमदार होते. युतीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते.
- फडणवीसांचे तत्कालीन ‘ओएसडी’ श्रीकांत भारतीय
- श्रीकांत भारतीयहे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. भाजपचे अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे फडणवीसांचे ‘ओएसडी’ होते. भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीत ते सदस्य आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वॉर रुमचे ते प्रमुख होते. शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांपैकी ते एक आहेत.
- जिंतूर मतदारसंघातून मेघना बोर्डीकर
- परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे तत्कालीन नेते रामप्रसाद बोर्डीकर यांची कन्या आणि राजकीय वारसदार म्हणून मेघना बोर्डीकर ओळखल्या जातात. भाजपात सध्या त्या सक्रिय नेत्या आहेत. २०१९ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली. जिंतूर मतदारसंघातून त्या निवडून आल्या. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर गावातील दीपक साकोरे यांच्या त्या पत्नी आहेत. दीपक साकोरे यांच्यासह त्यांच्या परिवारातील अनेक जण मंत्रालय स्तरावर उच्चाधिकारी आहेत.