mns Raj Thackeray pune mns politics forthcoming Pune Municipal Corporation elections

मनभेदाचे ‘ग्रहण’, एकीची मोट  बांधणे हेच मनसेपुढे आव्हान!

पुणे |एकीकडे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु झालेली  असताना,दुसरीकडे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘मनभेदाचे ग्रहण ‘ लागल्याने आता पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे कोणती  ठोस भूमिका घेतात याकडेच  राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मनसेच्या धडाडीच्या पदाधिकारी व  माजी नगरसेविका रुपाली  ठोंबरे पाटील यांनी पक्षालाच  ‘ जय महाराष्ट्र’ केल्याने पुणे शहरात मनसेत  मतभेदापेक्षा ‘मनभेद ‘ खदखदत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी निवडणुकीची तयारी करण्याऐवजी पक्षात पुन्हा ‘एकीची मोट’ बांधण्यावरच  मनसेची शक्ती खर्च होणार   व ते आव्हान राहणार असल्याचे   चित्र आहे.
पुणे दौऱ्यावर येण्याआधीच मनसेच्या धडाडीच्या पदाधिकारी रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षालाच ‘जय महाराष्ट्र ‘ केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजकीय पक्षात सर्वत्र  गटबाजी असते आणि ती नेहमीची गाजत असते, मात्र यापूर्वी मनसेमधील गटबाजी कधीही चव्हाट्यावर आली नव्हती. एका कुटुंबासारखे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मतभेद बाजूला सारून एकीचे दर्शन घडवीत असे.  मात्र आता मनसेमधील मतभेद हे मनभेदापर्यंत गेल्याचेच   अधोरेखित झाले आहे. याआधीच मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष  कल्पेश यादव यांनी  पक्षाची साथ  सोडून शिवसेनेला आपलेसे केलेले आहे. त्यावेळी याची पुसटशी चर्चा झाली मात्र आता  मनसेत मनभेद दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीत शहर मनसेत गटबाजी जोरात सुरु आहे. गटातटाच्या ‘टेबल ‘मुळे पक्षाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचीच कोंडी होत असल्याच्या वास्तवाकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे. काही मूठभर स्थानिक पदाधिकारी हेच  ‘ मी म्हणजे पक्ष ‘ अशा अविर्भावात वागत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यात घुसमट होत असल्याचे बोलले जात आहे. त्यात आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपशी युती करण्याच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भावनेला पक्षातील कार्यकर्त्यांचाच आक्षेप होता आणि आहे.
तत्कालीन पुणे पॅटर्नचा कारभार पालिकेत सुरु होताना काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या मनसेने पालिकेतील कामगिरी गाजवली मात्र त्यात अनेक विषयात मनसेने सोईस्कर भूमिका वठवत सत्ताधाऱ्यांना साथ दिली.त्यावेळचे स्थानिक पदाधिकारी पैकी आज काहींच्या हाती पक्षाची सूत्रे कायम आहेत तर पक्षाच्या स्थापनेपासून जोमाने काम करणारे अनेक जण आज पक्षाशी फारकत घेऊन लांब आहेत. एकेकाळी २९ नगरसेवक संख्या गाठणाऱ्या मनसेचे आज २ नगरसेवक आहेत.  आता प्रभाग रचना अंतिम  टप्प्यात आहे आणि तीन  सदस्यीय प्रभाग रचनेत हडपसर, कसबा आणि कोथरूड हे तीनच  विधानसभा मतदारसंघ  मनसेला जमेचे ठरणार आहेत.   मात्र पक्षातंर्गत  शह  काटशहाचे  राजकारण जोरात पेटले आहे. परिणामी  मतविभाजनाचा फटका मनसेलाच  बसणार असल्याचा दावा राजकीय अभ्यासकांचा असून   शहर काँग्रेसमधील जी अवस्था आहे ,तशीच अवस्था आज मनसेची झाली आहे.त्यामुळे निवडणुका या स्थानिक पातळीवर ‘सेटलमेंट’साठीच लढवल्या जातात हाच ठपका आगामी काळात मनसेवर बसण्याची दाट शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *