धाराशिव । देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आदेशाने राज्यात मी पहिल्यांदा बंडखोरी( rebel) केली, असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी केला. 2019 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मी स्वत: मिळून 150 बैठका घेतल्या आणि आमदारांचे मन वळवल्याचा दावाही त्यांनी केला.शिवाय महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मातोश्रीवर जाऊन हात वर करुन सांगितले होते की ”परत या मातोश्रीची पायरी चढणार नाही आणि हे सरकार उलथवल्याशिवाय तानाजी सावंत गप्प बसणार नाही”असेही ते म्हणाले.
धाराशीवमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सावंत म्हणाले की, जनतेच्या कौलाकडे पाठ वळवणाऱ्या लोकांना इशारा देण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हात दाखवणारा मी पहिला होतो.
30 डिसेंबर 2019 ला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.3 जानेवारी 2020 च्या आसपास सुजितसिंह ठाकूर, मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने तमाम महाराष्ट्रात पहिल्यांदा बंडखोरी केली.
धाराशिव जिल्हा परिषद शिवसेना-भाजपची, जे साडेबारा कोटी जनतेने मँडेट दिले होते , ती सुरुवात या ठिकाणाहून केली, ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळी बंडाचे निशाण फडकवणारा तानाजी सावंत होता,असे ते म्हणाले.
पुढे बोलताना सावंत म्हणाले, मी तेवढ्यापुरता थांबलेलो नव्हतो. ज्यांना इशारा द्यायचा होता, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मातोश्रीवर जाऊन हात करुन सांगितले , की परत या मातोश्रीची पायरी चढणार नाही आणि हे सरकार उलथवल्याशिवाय तानाजी सावंत गप्प बसणार नाही. असेही सावंत यांनी सांगितले.