मुंबई। महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शन वेळोवेळी केले जात आहे आणि ज्यांच्या बरोबर सत्तेत सहभागी आहेत,त्या शिवसेनेसह राष्ट्रवादीला स्वबळाचे इशारेही दिले जात आहे. प्रत्यक्षात पक्षात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी ही रणनीती असली तरी आता काँग्रेसमधील अंतर्गत गृहकलह मात्र वाढला आहे.
मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी अतुल लोंढे यांच्यावर आता सोपविण्यात आल्याने पूर्वीचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी राजीनामा देऊन नाराजी दर्शवली आहे. गेली अनेक वर्षे काँग्रेसची भूमिका मांडताना विरोधकांना थेट मुद्द्यांवर प्रश्नांचा भडीमार करून जेरीस आणणाऱ्या सावंत यांचेच ‘डिमोशन’ झाल्याने आता असंतोष खदखदत असला तरी राज्यातही काँग्रेस पक्ष गटातटातच अडकल्याचे अधोरेखित झाले आहे. प्रदेश काँग्रेसच्या कामात सुसूत्रता व वेग यावा यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समित्यांची पुनर्रचना केली आहे आणि विविध नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. मात्र त्यात माध्यम व संवाद विभागाची तसेच मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अतुल लोंढे यांच्यावर सोपवली. मात्र ती सोपवताना आधीचे मुख्य प्रवक्ते असणारे सचिन सावंत यांना लोंढे यांच्या हाताखाली असलेल्या माध्यम व संवाद विभागात समितीत समाविष्ट करण्यात आल्याने सावंत यांनी हायकमांडला थेट राजीनामा पाठवून नाराजी दर्शवली आहे. तसेच ट्विटर हँडलवरून प्रवक्ते पदाचा टॅगही काढला आहे. वास्तविक सचिन सावंत यांची कोणत्याही विषयावर आक्रमकपणे आणि मुद्देसूद मांडणी करून सत्ताधारी भाजपसह विरोधकांना खिंडीत गाठण्यात हातोटी आहे. तसेच गेली अनेक वर्षे ते ही भूमिका बजावत असून ते राज्यात काँग्रेसचा एक चेहरा बनले आहेत. त्यामुळेच राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या विधानपरिषदेसाठी १३ आमदारांच्या यादीत त्यांचे नावही आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध झाले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ते सातत्याने काँग्रेसची व महाविकास आघाडीची बाजू मांडत आले आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकार स्थापन होताच काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झाले.त्यातून पुन्हा अंतर्गत कलह वाढल्याचे आता काँग्रेसच्या वर्तुळात बोलले जात आहे.