नागपूर । आगामी विधानसभा निवडणुकी आधीच प्रतिस्पर्धी गारद करण्याची चाल उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यशस्वी करून दाखवली आहे. परिणामी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाप्रमाणे (Kasba assembly constituency) नागपूरच्या (Nagpur) बालेकिल्ल्यावर असलेली संभाव्य पराभवाची ‘टांगती तलवार’ तूर्तास हटली असली तरी काँग्रेससह अन्य पक्ष कोणती रणनीती आखतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे मात्र देवेन्द्र फडणवीस यांनी डॉ. आशिष देशमुख यांचा भाजप प्रवेश (Dr. Ashish Deshmukh joins BJP) करून घेताना राजकीय खेळीतील चतुरतेचे दर्शन घडविले आहे.
पक्षाच्या नेत्यांवरच कठोर शब्दात टीका करणारे डॉ. आशीष देशमुख यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात प्रबळ प्रतिस्पर्धी राहणार नाही अशी चतुर राजकीय खेळी यशस्वी केली आहे.रविवारी देशमुख यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश झाला. मात्र त्यामुळे मार्च महिन्यात झालेल्या पुणे जिल्ह्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची आठवण झाली. या निवडणुकीत बालेकिल्ल्यातच भाजपला काँग्रेसने धूळ चारली. त्यावेळी देशमुख काँग्रेसमध्ये (Congress)होते व त्यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना नागपुरातील दक्षिण-पश्चिम या फडणवीसांच्या विधानसभा मतदारसंघात कसब्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असे वक्तव्य केल्याने भाजपने त्याचा धसका घेतला होता. देशमुख यांच्या या वक्तव्याला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचाही आधार होता. त्यावेळी देशमुख यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध निवडणूक लढवून त्यांचे मताधिक्य कमी केले होते. त्यामुळेच देशमुख यांची प्रतिक्रिया याच अनुषंगाने होती.
आता फडणवीस यांनी देशमुखांनाच पुन्हा पक्षात घेऊन कसब्याच्या पुनरावृत्तीची शक्यताच संपुष्टात आणण्याची खेळी यशस्वी केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला त्यांच्या विरोधात नवा उमेदवार शोधावा लागणार आहे शिवाय कुणबीबहुल या मतदारसंघात भाजप देशमुखांचा काँग्रेस विरोधात योग्य वापर करून घेण्याची शक्यताही दाट आहे. मात्र देशमुख यांच्या राजकीय भवितव्याचे काय? या प्रश्नावरही पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खुद्द फडणवीस यांनीच उत्तर देऊन टाकले आहे. देशमुख आता पक्ष सोडणार नाहीत, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार आहेत, संयम आणि सबुरी ते ठेवणार आहेत, असे या दोन्ही नेत्यांनी सांगून देशमुख यांच्या कामाची दिशा पुढे काय असेल हे स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात भाजप देशमुखांचा नुसताच वापर करणार की त्यांच्या राजकीय भवितव्याला उभारी देणार हे काळच ठरवणार असले तरी सध्या दक्षिण-पश्चिममधील कसब्याच्या पुनरावृत्तीची शक्यता संपुष्टात आलेली आहे.(Devendra Fadnavis’s clever move: ‘Kasabya’ repeat ends in Nagpur’s fort!)