ncp congress shivsena maharashtra politics

… ‘बघ्या’च्या भूमिकेचा काँग्रेसलाच फटका बसणार !

पुणे। राज्यात कोरोना आता आटोक्यात आला आहे ;पण गेली दीड -दोन वर्षे उपाययोजनात घालवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला भाजपकडून  केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे  चौकशी सत्राचे ‘ग्रहण’ लागले आहे.  शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमागे लागलेला हा चौकशीचा ससेमिरा या दोन्ही पक्षप्रमुखांसाठी  एक डोकेदुखी ठरली आहे. भाजप नेत्यांकडून होणाऱ्या आरोपांना सेना – राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे आणि एकीचे दर्शनही घडविले जात आहे. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष केवळ बघ्याची  भूमिका  सोईस्कर वठवत असल्याने आगामी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये  काँग्रेसला ते  महागात पडण्याची दाट चिन्हे आहेत.
कोरोना आता आटोक्यात आला आहे. जनजीवन सुरळीत होत आहे. मात्र राजकीय पातळीवर महाविकास आघाडीचा कारभार कसा विस्कळीत होईल,याकडेच  भाजपचे लक्ष  आहे. महाविकास आघाडीच्या कारभाराला लक्ष्य करण्यासाठी भाजपच्या गोटातून सातत्याने आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. विशेषतः भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून आरोप होताच, ज्यांच्यावर आरोप झाले,त्यांच्यामागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागत असल्याने महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष चिंताग्रस्त झाले आहेत. तर सेना – राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसच्या  नेत्यांवर आरोप होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने काँग्रेसने सध्यस्थितीत महाविकास आघाडीत राहूनसुद्धा केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. शिवाय स्वबळाचे नारे देऊन ‘ बिघाडी’ चा पटही   मांडला आहे. केंद्रीय तपास  यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा असाच सुरु राहिला तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्याचा मोठा फटका  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बसणार आहे.नेमक्या या बाबीनुसार काँग्रेसने रणनीती बदलली आहे का ? हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.  कोरोनापाठोपाठ राज्यात महागाई, महिला अत्याचार , शेतकरी आत्महत्या हे प्रश्नही गंभीर होत आहे आणि कारभार कसा करावा यासाठी तारेवरची कसरत होत आहे. त्यात भाजपकडून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. भाजपची ही  रणनीती तूर्तास यशस्वी ठरत असली तरी सत्तेवर येताना भाजपने पर्यायाने मोदी सरकारने घेतलेल्या आणाभाका आणि वाढत्या महागाईचा मुद्दा झाकण्यासाठी राज्यात भ्रष्टाचाराचा कळस हे आभासी वातावरण भाजपकडून निर्माण केले जात असून सेनेसह राष्ट्रवादीलाच जास्त लक्ष्य केले जात आहे.  भाजपच्या आरोपांना महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. पण  काँग्रेसची भूमिका अलिप्तवादी आहे. त्यात या आधी महाविकास आघाडीची बाजू जोरदारपणे मांडताना भाजपला खिंडीत गाठणाऱ्या काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांचे डिमोशन काँग्रेसने केले आहे.  सावंत यांचे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांशी चांगले संबंध झालेले आहेत. त्यामुळे त्यांना अप्रत्यक्ष  पदावरून पायउतार होण्यास भाग पाडण्याचे काँग्रेसचे राजकारण नक्की कुणाच्या विरोधात आहे, या मुद्द्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहे. काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेसाठी यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला आहे.एकप्रकारे ‘ वेगळ्या चुलीची’ भूमिका काँग्रेसची आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला खिंडीत गाठण्यासाठी  वेगळे डावपेच होणार आहेत. महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेवरून ताणून धरण्यासाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला होता आणि प्रदेशाध्यक्षांची भूमिका महाविकास आघाडीतील सेना – राष्ट्रवादी विरोधातच सातत्याने राहिली. त्यामुळे प्रभागरचनेत सोईस्कर प्रभाग आणि स्थानिक पातळीवर ‘ बेरेजचे समीकरण ‘ सेना – राष्ट्रवादीकडून होणार आहे. त्यासाठी बहुतांश महापालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर आघाडी होईल. त्यात दोन राष्ट्रवादी आणि एक शिवसेना अशी ‘ मात्रा’ वापरली जाणार आहे. जास्त ताणून धरण्याची काँग्रेसची भूमिका कायम राहिली काय आणि जमवून घ्यायचे म्हटले तरी स्थानिक पातळीवर मतांचे समीकरण, इलेक्टीव्ह मेरिट’  पाहूनच महाविकास आघाडीचा  एकत्र लढण्याचा निर्णय होणार आहे. मात्र २ राष्ट्रवादी, १ शिवसेना असे  प्राधान्य बहुतांश प्रभागात  राहील तर काही प्रभागांमध्ये काँग्रेसचा समावेश राहील. जास्तीस जास्त आपल्या पक्षाचेच  उमेदवार कसे निवडून येतील यानुसार जागावाटपाचा फार्म्युला होईल आणि सोईस्कर प्रभागात २ राष्ट्रवादी, १ सेना ही ‘मात्रा’ वापरली जाणार आहे.असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.पण कोणत्याही स्थितीत महाविकास आघाडी एकत्र लढली पाहिजे ;अन्यथा भाजप पुन्हा डोईजड होईल असा इशाराही राजकीय विश्लेषकांनी दिला  आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *