Conflict in NCP again

‘कारभारी’ वरून राष्ट्रवादीत पुन्हा कलह!

पुणे|  तत्कालीन पुणे पॅटर्नच्या  सत्तेपासून राष्ट्रवादी भवनचे पाहिलेले स्वप्न आता साकार झाले असले तरी त्यानिमित्ताने  आता  राष्ट्रवादीत कलह सुरु झाला आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या  पालिकेच्या कारभारावर ‘कब्जा’ मिळविण्यासाठी थेट पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करून त्यांना  थेट नामधारी ठरविण्याचा प्रकार सातत्याने होत असल्याने राष्ट्रवादीतील    कलह आता  विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. 
आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जय्यत तयारी चालवली असली तरी, पक्षांतर्गत नाराजीही वाढत असल्याने पक्षात आलबेल नसल्याचेच  स्पष्ट झाले आहे. परिणामी त्याचा फटका पालिका निवडणुकीत जास्त बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहर राष्ट्रवादी विरुद्ध पालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक असा ‘ गृह कलह ‘ पेटण्याच्या  मार्गावर असला तरी पक्षातील जुने नेतेही सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. विद्यमान  शहराध्यक्ष हे कुणालाच  विचारात घेत नाहीत. परस्पर तेच निर्णय घेत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात पालिका निवडणुकीसाठी पक्षासाठी अनुकूल  प्रारूप प्रभाग रचना करताना पक्षातील स्थानिक नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि  सहकारी पक्षांना  विश्वासात न घेतल्याचा फटका आता बसल्याचे स्पष्ट झाले आहे आणि तो मुद्दाही वादग्रस्त ठरला आहे.शहर पातळीवर हवे ते निर्णय घ्या,मात्र पालिकेत आमच्या कामकाजात हस्तक्षेप कशाला असा सवालही पक्षातील नगरसेवक उपस्थित करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात पालिकेतील पदाधिकाऱ्यांना ‘ मी दालनात आलो कि, उभे राहायचे ‘ अशी अपेक्षा व्यक्त केल्याची कुजबुजही राष्ट्रवादीच्या गोटात  आहे. त्या प्रकारावरून पक्षातील नगरसेवकांमध्ये संतप्त भावना आहे.राष्ट्रवादीला गट तट नवीन नाहीत . यापूर्वीही अनेकवेळा गटबाजीचा उद्रेक पाहावयास मिळालेला आहे. पुणे पॅटर्नच्या काळात अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष असे दोन पद निर्माण करण्यात आले होते, त्यावेळीही शहर राष्ट्रवादी विरोधात पालिकेतील राष्ट्रवादीचे कारभारी असा सामना अनेकवेळा रंगलेला होता आणि तो गाजलाही होता. त्यावेळी राष्ट्रवादी पालिकेत सत्तेत होती.  आज विरोधी पक्षात आहे. मात्र पालिका कारभारावर  अंकुश ठेवण्यासाठी थेट दबावतंत्र वापरण्यात येत असल्याने  आता एकसंध दिसत असलेल्या राष्ट्रवादीत पुन्हा ‘दादा’ समर्थक विरुद्ध ‘साहेब’ समर्थक असे चित्र दिसण्याची   चिन्हे आहेत. सध्या शहरातील जुन्या नेत्यांनी ‘वेट अँड वॉच ‘ची भूमिका घेतली असली तरी पक्षाच्या नेतृत्वाकडे ‘कैफियत’ मांडली  जाणार आहे.असे असले तरी शहराध्यक्ष जी भूमिका घेतात, त्याच्या नेमकी उलट भूमिका या जुन्या नेत्यांची आहे आणि ती समाजमाध्यमांवरही दिसून येत आहे.  भाजपच्या सत्तेवर आगपाखड करायची आणि  स्वतः चर्चेत राहायचे,’ ब्रॅंडिंग करायचे  ही ‘स्ट्रॅटेजी’ वापरताना पक्षाच्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची मात्रा किती काळ टिकणार हे लवकरच  स्पष्ट होईल.तूर्तास शहराध्यक्षांच्या बैठकीकडे आता नगरसेवक पाठ फिरवत आहेत. त्यात राष्ट्रवादी भवनसाठी सर्वांचेच योगदान आहे, हा मुद्दाही राष्ट्रवादीच्या गोटात गाजत आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *