मुंबई।
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सहयाद्री अतिथीगृहा वर सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यात गुरुवारी हिंदू विश्व परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केलेला आशावाद आणि राज्यपालांनी १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात चर्चेसाठी दिलेली १ सप्टेंबरची वेळ या पार्श्वभूमीवर या बंद दाराआड झालेल्या बैठकीला महत्व आले आहे.
त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणाची किनारही असू शकते, असा चर्चेचा सूर आळवला जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे भाजपवरही शिवसेनेचा रोष वाढला आहे. आधीच तुटलेली युती पुन्हा जुळणार नाही असे स्पष्ट असताना राजकारणात कधीही काहीही होऊ शकते आणि एका पंगतीत भाजप – शिवसेना भविष्यात जेवायलासुद्धा बसतील, एकमेकांची गळाभेट घेतील असा आशावाद हिंदू विश्व परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी गुरुवारी व्यक्त केला होता. त्यानंतर आज शुक्रवारी ही बंद दाराआड झालेली चर्चा ‘सामोपचारा’ची होती कि, राणे प्रकरणावरून सारवासारवीची होती, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा झडत आहे. मात्र या बैठकीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.