Conflict in NCP again

पुण्यात स्पष्ट बहुमत, हेच राष्ट्रवादीचे लक्ष्य !

पुणे| 

यंदाच्या  पुणे महापालिका निवडणुकीत   कोणत्याही स्थितीत पक्षाचे स्पष्ट बहुमत कसे येईल  यावर राष्ट्रवादी काँग्रेसने  लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यानुसार ‘इलेक्टीव्ह मेरीट’नुसार उमेदवारी वाटपाचा फैसला होणार आहे . त्यासाठी चाचपणी म्हणून राष्ट्रवादीकडून दोन सर्व्हेही घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र पालिकेवरील सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी ‘आयारामां’ना किंवा भाजपमधून ‘घरवापसी’ करणाऱ्यांना  संधी दिली तर पक्षांतर्गत रोषालाही राष्ट्रवादीला सामोरे जावे लागणार आहे.   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील    काही  निवडणुकांवेळी स्थानिक नेतृत्व किंवा नेत्यांकडून काही  मर्जीतील उमेदवारांसाठी आटापिटा केला गेला. प्रत्यक्षात त्यांनी शिफारस केलेले उमेदवारच पराभूत झाले होते.  इतरवेळी एकमेकांविरोधात असणारे स्थानिक नेते निवडणुकीवेळी मात्र आपापल्या व्यक्तींना उमेदवारी मिळविण्यासाठी एकत्र येऊन  कोणत्या प्रभागातून कोण , कसा निवडून येईल याचे आभासी चित्र अहवालातून रंगवतात. अगदी पुण्यातील एका एजन्सीने सादर केलेल्या अहवालातही फेरफार करण्यात आल्याचा प्रकार  त्यावेळी पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आला होता. त्यानुसारच स्थानिक पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन उमेदवारी देण्याचा पायंडा  मोडीत काढण्यासाठी  पक्ष नेतृत्वाकडून खासगी यंत्रणेकडून दोन वेळा सर्व्हे करून त्यानुसार उमेदवार निवड प्रक्रिया राबविण्यात आली  होती. यंदाही उमेदवार वाटपातील  ‘घुसखोरी’ टाळण्यासाठी ‘इलेक्टिव्ह मेरिट’ तपासूनच प्रत्येक वॉर्डात  उमेदवारी कोणाला द्यायची याचा फैसला होणार आहे. त्यासाठी दोन सर्व्हे खासगी  एजन्सीमार्फत झाले आहेत आणि एक आता होत आहेत.या एजन्सीमार्फत प्रत्येक प्रभागाचा तसेच विद्यमान माननीय, इच्छुक या सर्वांची  वैयक्तिक व सामाजिक स्तरावरील प्रतिमेचा डाटा गोळा  करण्यात आला आहे. त्यात कोण कुणाशी संबंधित आहे.स्थानिक पातळीवरील मतांचे समीकरण या मुद्यांचाही  समावेश या सर्व्हेच्या कामात करण्यात आला आहे.तर पूर्वी दिग्गज असणारे पण सध्या राजकीय प्रवाहात नसले तरी त्यांना मानणारा वर्ग त्या त्या भागात आहे, अशी  राजकीय मंडळी पालिकेतील पक्षीय बलाबलसाठी कशी पथ्यावर पडतील याचीही माहिती गोळा करण्यात आली   आहे. पक्षात गटबाजीविरहित उमेदवार प्रक्रिया व्हावी आणि पालिकेवर स्पष्ट बहुमत मिळावे  याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.   जनमानसात लोकप्रिय कार्यकर्ते, पण पक्षीय राजकारणात पडद्याच्या आड असलेल्या चेहऱ्यांना संधी देताना भाजपच्या विद्यमानांना ‘घरचा रस्ता’ दाखवण्याची रणनीती यामागे आहे.त्यासाठी काँग्रेसमधील जुन्याजाणत्यांचे ‘ इनकमिंग’ सुरु करण्यात आले आहे.तसे भाजपमधील नाराजांनाही  सामावून घेतले जाणार आहे. सद्यस्थितीत पक्षहितासाठी स्थानिक नेत्यांच्या ‘लॉबिंग’ला कोणताही थारा द्यायचा नाही, यावर भर दिला जात असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

… अप्रत्यक्ष ज्येष्ठांसह घराणेशाहीला प्राधान्य

नव्या प्रभाग रचनेत  राष्ट्रवादीला अनुकूलता मिळणार असली तरी, महाविकास आघाडीबाबत अंतिम क्षणी निर्णय होण्याचे संकेत आहे;पण स्थानिक पातळीवर आघाड्यांचा  वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो. हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे सध्या काही प्रभागांमध्ये दोन राष्ट्रवादी, एक शिवसेना तर काही ठिकाणी दोन शिवसेना,एक राष्ट्रवादी असे समीकरण स्थानिक पातळीवर इच्छुक दिग्गजांनी केले आहेत. त्यानुसार अपेक्षित प्रभाग रचनेचे नकाशे खासगी संस्थांमार्फत तयार करून त्यानुसार ‘बदल’ घडवून आणल्याची चर्चा आहे.परिणामी ज्येष्ठ आणि विद्यमान तसेच अनुभवी ‘आजी – माजी विद्यमानांना पोषक स्थिती निर्माण केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही  वस्तुस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे   पक्षात यंदा युवकांना संधी देताना जुन्यांचा समन्वय साधला जाणार असला तरी अप्रत्यक्ष घराणेशाहीला प्राधान्य दिले जाते का ? तसेच बाहेरून पक्षात दाखल होणाऱ्यांना किती स्थान मिळते  याकडे राष्ट्रवादीच्या  कार्यकर्त्यांचे, इच्छुकांचे  लक्ष आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *