पुणे प्रतिनिधी
आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता सप्टेंबर अखेरपर्यंत प्रभाग रचनेचे चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी प्रभाग एक सदस्य की द्विसदस्यीय यावर येत्या पंधरा दिवसात महाविकास आघाडी सरकारकडून निर्णय होणार आहे. परिणामी ‘सोई ‘चा प्रभाग मिळतो कि, नव्याने रणनीती आखायची यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी चालवली आहे. त्यातही आरक्षण पडले तर काय ? त्यासाठीची व्यूहरचनाही इच्छुकांकडून आतापासून आखली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका निवडणूक पुढे ढकलली जाईल अशी अटकळ बांधण्यात येत होती मात्र महापालिका निवडणूक निर्धारित वेळेत म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातच घेण्याकडे महाविकास आघाडी सरकारचा कल आहे. त्यानुसार हालचाली सुरू झाल्या आहे . प्रभाग एक सदस्य कि द्विसदस्यीय यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत मात्र आरक्षण सोडतीत संभाव्य प्रबळ उमेदवारांची कोंडी होण्याबरोबरच सत्तेसाठीच्या संख्याबळावरही परिणाम होऊ शकतो याचा विचार करून द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीला ‘ हिरवा कंदील’ दाखवला जाणार आहे. जर द्विसदस्यीय प्रभाग पद्धत झाल्यास,त्याचा विद्यमान सत्ताधारी भाजपला मोठा फटका बसेल यानुसार द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीला अनुकूलता दर्शवली जाणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी दाखल करण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यासाठी केवळ पंधरा दिवसांचा कालावधी मिळेल. त्यानंतर हरकती-सूचनांची कार्यवाही आणि मग प्रभाग निश्चित होणार आहेत. आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडल्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत पुण्यातील प्रभागरचनेचे चित्र स्पष्ट होईल ,असे प्रशासकीय पातळीवरून सांगितले जात आहे.