पुणे|आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आता भारतीय जनता पार्टीकडून ‘ जुन्या जाणत्यां’ना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. त्यानुसार माजी खासदार, माजी आमदार ते विविध पदे भूषविलेल्या माजी पदाधिकाऱ्यांच्या हाती सूत्रे सोपविण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार ही निवडणूक होणार असून प्रारूप प्रभागरचनाही महापालिकेने निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. मात्र राज्यात ज्याचे सरकार असते,त्यांना अनुकूल असलेलीच प्रभाग रचना तयार केली जाते असा एक पायंडा पडलेला आहे. गतवेळी राज्यात भाजपने त्या जोरावर प्रभागरचना अनुकूल करून घेताना दिग्गज आणि प्रस्थापितांना ‘मिनी विधानसभे’च्या धर्तीवर मतदारसंख्या निर्माण करून गारद केले होते आणि एकहाती सत्ता पालिकेवर आणली होती. मात्र त्यावेळी मोदी लाट त्यानंतर राज्यात सत्तांतर याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणावर झाला आणि ज्यांना जनमानसात भक्कम जनाधारही नव्हता असे अनेक चेहरे पालिकेच्या सभागृहात भाजपच्या तिकिटावर दाखल झाले. मात्र यंदा मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे. कोरोनामुळे लोकं हतबल झाली आहेत. वाढत्या महागाईचा आगडोंब उसळत आहे. हे वास्तव भाजपला प्रतिकूल ठरणार असले तरी पाच वर्षात प्रभागांमध्ये कोणती ठोस विकासकामे केली या मुद्द्याला भाजपला सामोरे जावे लागणार आहे.याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले आहे.
स्मार्ट सिटी, मेट्रो आणि शहरातील विकासकामांच्या जोरावर प्रभागांमध्ये मतदानाचे आवाहन भाजपला जिकरीचे ठरणार आहे. त्यात राष्ट्रवादीला पर्यायाने महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांना नगरसेवकांची संख्या वाढविण्याची संधी उपलब्ध झाली आहे तर राष्ट्रवादीला अपेक्षित अशी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने व्यूहरचना आखली आहे. ज्या पद्धतीने गतवेळी भाजपने निवडणुकांमध्ये फक्त भाजप असे चित्र निर्माण केले. त्याचधर्तीवर आता राष्ट्रवादीकडून वातावरण निर्मिती सुरु झाली आहे. राज्यातील महत्वांच्या शहरातील पालिका निवडणुका या आगामी विधानसभा निवडणुकांची ‘रंगीत तालीम’ म्हणून राष्ट्रवादीने आता जय्यत तयारी चालविली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी पक्षात यंदा युवकांना संधी देताना जुन्यांचा समन्वय साधला जाणार आहे आणि स्थानिक पातळीवर नवे समीकरण उदयास आणायचे धोरणही ठरविले आहे.त्यानुसार काँग्रेससह भाजपमधील अनेकांचा आधीच पक्ष प्रवेश करून घेण्यात आला आहे . तर भाजपमधील बहुतांश विद्यमान नगरसेवक हे पक्षातून घात झाला तर, तसेच प्रभागरचनेनुसार चाचपणी करून ‘ वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. त्यात नव्या प्रभाग रचनेत जमेच्या बाजू कोणत्या आणि फटका कुठे बसू शकतो याचा आढावा सर्वच पक्षातील विद्यमान असो किंवा इच्छुक आता घेत आहेत. त्यात भाजपमध्ये इच्छुकांची ‘ मांदियाळी’ वाढणार असली तरी बंडखोरी , पक्षांतराला भाजपला सामोरे जावे लागणार आहे. त्यात नाराजांची समजूत कशी काढणार ? या पेचात भाजप अडकणार आहे. विशेषतः आगामी सत्ता समीकरणे राष्ट्रवादीकडे हे हेरून भाजपमधील दोन डझन विद्यमान नगरसेवक हे प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर तसेच आरक्षण सोडतीनंतर राष्ट्रवादीच्या गोटात दाखल होणार आहेत. याचीच धास्ती भाजपला आहे. प्रारूप प्रभाग रचना ही राष्ट्रवादीसह शिवसेना आणि काँग्रेसला अनुकूल झाल्याची चर्चा आहे. त्यात ज्येष्ठ ‘ माननीयां’सह जे जे आता प्रवाहाच्या बाहेर आहेत. अशा माजी नगरसेवकांना तीनचा प्रभाग सोईस्कर ठरेल असा करण्यात आलेला आहे. यंदा १७३ पर्यंत नगरसेवकांची संख्या झाली असून ५७ प्रभाग तीन सदस्यीय तर १ प्रभाग दोन सदस्यीय असे ५८ प्रभाग असणार आहेत.
प्रभागात कोणकोणती विकासकामे झाली या मुद्द्याला बगल देतानाच जे नवे चेहरे यापूर्वी पालिकेच्या सभागृहात पाठवले त्यांना ‘विश्रांती’ देण्याची रणनीती भाजपची असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. नव्या प्रभागरचनेत जनमानसात काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जुना मंडळींना मानणाऱ्या माजी नगरसेवकांचा बहुतांश भाग असल्याने, त्यानुसार उमेदवार देण्यासाठी भाजपने आता माजी खासदार, माजी आमदार, पालिकेत विविध पदे भूषवलेली तसेच स्थानिक पातळीवर नागरिकांशी उत्तम संपर्क असलेले मात्र आजतागायत पक्षातील पदांशिवाय नगरसेवक पदाची संधी न मिळालेल्या मंडळींकडे निवडणुकीची सूत्रे सोपवली जाणार आहे. त्यानुसार दोन बैठकाही झाल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे.