kasba Assembly By-election: The defeat is not of Hemant Rasne but of BJP!

BJP’s circle :प्रतिकूलतेतही भाजपला  अनुकूलता,फक्त ‘जुन्या – जाणत्यां’कडे सूत्रे द्या!

पुणे| 
प्रभाग रचनेत मोठे फेरबदल करून घेण्यात महाविकास आघाडीला  यश आले असले तरी कोंडीत अडकलेल्या भाजपला ( BJP) वर्चस्व राखण्यासाठी काटेकोर नियोजन केले तरी प्रतिकूल प्रभागरचनाही अनुकूल ठरू शकते असा सूर आता भाजपच्या वर्तुळात ( BJP’s circle)  आळवला जात आहे. त्यात पूर्वाश्रमीच्या मात्तबरांकडे जबाबदारी सोपवा,अशी भूमिका मांडण्यात येत असली तरी जुने विरुद्ध नवे  हा वाद यानिमित्ताने ऐरणीवर येण्याची चिन्हे  आहेत.
तीन  सदस्यीय प्रभाग रचनेनुसार ही  निवडणूक होणार आहे. त्यात    राज्यात ज्याचे सरकार असते,त्यांना अनुकूल असलेलीच  प्रभाग रचना तयार केली जाते असा एक पायंडा पडलेला आहे. तो यंदा पुढे नेत  महाविकास आघाडीने मोठ्याप्रमाणावर फेरबदल करून मागील निवडणुकीचा वचपा काढला आहे. गतवेळी राज्यात  भाजपने सत्तेच्या जोरावर प्रभागरचना अनुकूल करून घेताना विरोधी पक्षातील दिग्गज आणि प्रस्थापितांना ‘मिनी विधानसभे’च्या धर्तीवर मतदारसंख्या निर्माण करून गारद केले होते आणि एकहाती सत्ता पालिकेवर आणली होती. मात्र त्यावेळी मोदी लाट त्यानंतर राज्यात सत्तांतर याचा फायदा भाजपला  मोठ्या प्रमाणावर झाला  होता.  मात्र यंदा तसे चित्र नाही. कोरोना त्यात महागाईचा आगडोंब आणि  मोदींची लोकप्रियता  कितपत कमी येईल याबाबतही भाजपच्या वर्तुळात साशंकता आहे. त्यात शहरातील विकासकामेही अर्धवट अवस्थेत असल्याने, त्यावरून विरोधी पक्ष प्रामुख्याने राष्ट्रवादीकडून ( NCP ) सातत्याने भाजपच्या कारभाराचे पोस्टमार्टेम होत आहे. आता प्रभाग रचना हरकती सूचनांसाठी जाहीर झाली असली तरी आजमितीस ४० हरकती दाखल झाल्या आहेत. प्रभाग रचनेतील मोठ्या फेरबदलाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देणाऱ्या भाजपने अजून पुढचे  कोणतेही पाऊले उचलली नाहीत. निवडणुकीची धामधूम सुरु असताना राष्ट्रवादीकडून ‘ फोडाफोडी’चे राजकारण जोरात सुरु झाले आहे. प्रत्युत्तरादाखल भाजपकडून काँग्रेस व अन्य पक्षातील मंडळी खेचून त्यांना पदे बहाल केली जात आहे. मात्र यावरूनही भाजपच्या निष्ठवंतांमध्ये असंतोष धुमसत आहे. बाहेरून आलेल्यांना थेट मानाचे  स्थान मिळत असल्याने, भाजपमधील जुनी मंडळी अस्वस्थ झाली असून, या धोरणाला आक्षेप घेत आहे. त्यातूनच आता पक्षाच्या ‘ जुन्या जाणत्यां’ना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेतले तरच  तसेच   माजी खासदार, माजी आमदार ते विविध पदे भूषविलेल्या माजी पदाधिकाऱ्यांच्या हाती सूत्रे सोपविण्याची व्यूहरचना आखली तर सध्या प्रतिकूल असणाऱ्या प्रभाग रचनेत भाजपला  निश्चित यश मिळेल ही  भूमिका मांडली  जात आहे. यंदा  शिवाजीनगर, कोथरूड, कसबा, पर्वती या चार विधानसभा मतदारसंघाला राष्ट्रवादीकडून टार्गेट केले जाणार असले तरी या मतदारसंघावर भाजपची  पकड ठेवण्यासाठी पक्षाच्या  जुन्या – जाणत्यांची हाती  सर्व सूत्रे  सोपवून उर्वरित मतदारसंघावर लक्ष केंद्रीत  करणे सहजशक्य आहे. केवळ बाहेरचे लोक  भाजपमध्ये आणून ताकद वाढणार नाही उलट पक्षात उमेदवारी वाटपावरून असंतोष निर्माण होईल.आधीच विद्यमान १०० नगरसेवकांना सामावून कसे घ्यायचे हा पेच नव्या प्रभाग रचनेतील फेरबदलांमुळे निर्माण झाला आहे. त्यात समाविष्ट गावांमुळे वडगावशेरी,हडपसर , खडकवासला या विधानसभा मतदारसंघात प्रतिकूल स्थिती निर्माण झाली आहे.नैसर्गिक हद्दींचे  बंधन न पाळता   प्रभागामध्ये झालेले   फेरबदल मोठे  आहेत.   त्यामुळे उमेदवारी वाटपात निवडप्रक्रिया  योग्यरीत्या केल्यास प्रतिकूल प्रभाग रचना  कशी अनुकूल करून घेता येईल यासह आरक्षणे, विरोधी पक्षातील बंडखोरी, मतविभाजन याकडे पक्षाने आतापासून लक्ष देऊन त्यानुसार नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी जुन्या – जाणत्यांवर सर्व जबाबदारी सोपवावी.    नव्या  प्रभागरचनेत  जुना मंडळींना मानणाऱ्या माजी नगरसेवकांचा बहुतांश भाग असल्याने, त्यानुसार उमेदवार देण्यासाठी भाजपने आता माजी खासदार, माजी आमदार, पालिकेत विविध पदे भूषवलेली तसेच स्थानिक पातळीवर नागरिकांशी उत्तम संपर्क असलेले मात्र आजतागायत पक्षातील पदांशिवाय नगरसेवक पदाची संधी न मिळालेल्या मंडळींकडे निवडणुकीची सूत्रे द्यावीत यावर भाजपमध्ये खलबते सुरु झाली आहेत.  याआधी दोन बैठकाही यासंदर्भात  झाल्या होत्या मात्र त्यानंतर कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत मात्र आता जाहीर झालेली प्रभाग रचना पाहता आणि हरकती सूचना प्रक्रियेत जेमतेम किरकोळ बदल होतात हा अनुभव लक्षात घेता जुन्या – जाणत्यांच्या हाती यंदाची निवडणूक सोपवा ही  भूमिका आता भाजपमध्ये रेटून धरली जात आहे ;पण अंतर्गत गटातटाच्या वर्चस्व वादात कोणता फैसला होतो याकडेच भाजपेयींचे लक्ष लागले आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *