bjp congress ncp politics Pune Municipal Election 2022

प्रभागरचनेत भाजपची ‘बाजी’, राष्ट्रवादीत धाकधूक!

पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर झाला असला तरी त्यात भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी बाजी मारल्याने राष्ट्र्वादीत विद्यमानांसह 
इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रभाग रचना प्रतिकूल ठरत असल्याची बाब कथन केल्याचेही बोलले जात आहे. 
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. साहजिकच ज्यांचे सरकार, त्यांना अपेक्षित असलेली प्रभाग रचना तयार होते,असा एक पायंडा पडलेला आहे. गतवेळी भाजपने राज्यातील सत्तेच्या जोरावर अनुकूल प्रभाग रचना करून घेतल्याने पुणे शहरात राष्ट्रवादीसह अन्य पक्षातील दिग्गज मंडळी गारद झाली होती. यंदा महाविकास आघाडी सरकार असल्याने राष्ट्रवादीकडून अनुकूल प्रभाग रचना कशी होईल, यापेक्षा भाजपला कसा फटका बसेल याचाच  डांगोरा पिटण्यात आला. मात्र तो आता राष्ट्रवादीला महागात पडणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 
दबावतंत्राला यश… ?
प्रशासनाकडून प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर होण्यापूर्वीच भाजपकडून अपेक्षित प्रभागांचे नकाशे प्रशासनाकडे देऊन त्यानुसार प्रभाग रचना करण्यासाठी भाजपच्या राज्यातील  एका वरिष्ठ नेत्याने थेट केंद्राकडून दबाव टाकल्याची कुजबुज आता राष्ट्रवादीच्या गोटात होत आहे. परिणामी सध्याच्या ठोकताळ्यानुसार शहरातील बहुतांश संभाव्य प्रभाग हे भाजपला अनुकूल ठरत असल्याने राष्ट्रवादीतील विद्यमानांसह इच्छुकांचे धाबे दणाणले आहे.भाजपच्या कार्यालयाच्या उदघाटनादरम्यान एका अति वरिष्ठ अधिकाऱ्याला थेट केंद्रातील दिग्गज नेत्याला दूरध्वनी लावून देण्यात आला आणि प्रभाग रचनेसाठी दबाव टाकून स्वार्थ साधण्यात भाजपला  यश आल्याचे बोलले जात आहे. त्यात पालिकेतील तसेच शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी जाऊन भेट घेतल्याची चर्चाही रंगली होती. मात्र ‘पायाखालची वाळू सरकली’ या अवहेलनेने त्याकडे राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीकडून पाहिले  गेले;पण आता अनुकूल प्रभाग रचनेत भाजपने बाजी मारल्याचे स्पष्ट होत असल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. बहुतांश प्रभागात भाजपला  मानणाऱ्या मतदारांचा मोठा  भाग कसा येईल, यानुसार प्रभागरचना झाल्याचे बोलले जात आहे आणि त्यामूळेच राष्ट्रवादीतील इच्छुकांची घालमेल वाढली आहे.
सत्तेपासून दूर… 
पुणे महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार कि, स्वबळावर याचा अजून फैसला झालेला नाही किंबहुना त्याचे संकेतही मिळालेले नाहीत.  त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा आग्रह धरला आहे. तर शहरातील काँग्रेसचे मूठभर विद्यमान महाविकास आघाडीतून निवडणुकीला सामोरे जाण्याची इच्छा प्रदर्शित करत आहे. राष्ट्रवादीच्या गोटात शिवसेनेशी आतापासूनच स्थानिक पातळीवर पॅनल करून रणनीती आखली जात आहे. तर शिवसेनाही पूर्वीची ताकद प्राप्त करण्याकडे लक्ष देत आहे.त्यात राष्ट्रवादीला पुन्हा कारभारी व्हायचे आहे. त्यामुळे आगामी सत्ता समीकरणात कारभारी कोण आणि महापौर, उपमहापौर,स्थायी अध्यक्ष यासह अन्य पदांचे वाटप हा मुद्दा बिघाडीला कारणीभूत  ठरणार आहे. त्यात प्रभाग रचनेत मतांचे गणित बिघडले तर राष्ट्रवादीला आगामी सत्तेपासून दूर राहावे लागण्याची भीती इच्छुकांमध्ये आहे. त्यामुळे लढायचे की अलिप्त राहायचे या पेचात राष्ट्रवादीतील इच्छुक अडकले आहेत.त्यात पॅनेलमध्ये बलाढ्य सहकारी उमेदवार कसे आणायचे हा प्रश्नही आतापासून भेडसावत आहे.  अनुकूल प्रभाग रचनेसाठी राष्ट्रवादीतील काही मात्तबरांनी स्वतःच्या सोईची प्रभाग रचना करण्याकडे भर दिला. परिणामी त्याचा फटका राष्ट्रवादीतील अन्य मंडळींना बसला. प्रभागाची मोडतोड आणि राष्ट्रवादीत अपेक्षित  प्रभागावरून सुरु असलेल्या स्पर्धेचा   फायदा घेत, थेट भाजपला  मानणाऱ्या मोठ्या  मतदारांनुसार  भागांचा समावेश अचूकतेने भाजपने  केल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *