पुणे । ”देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा. मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.” अशा रोखठोक शब्दात माजी आमदार मेधा कुलकर्णी (Former MLA Medha Kulkarni ) यांनी भाजपचीच (BJP) कानउघडणी केली आहे. एकप्रकारे भाजपच्या ‘पार्टी विथ डिफरन्स मधला ‘डिफरन्स’ च संपला आहे का ? हा मुद्दाही यानिमित्ताने महत्वाचा ठरला आहे.
भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमीही आहे. संघाची विचारधारा आणि समाजहिताचा उद्देश असणाऱ्या भाजपची सत्तेत आल्यावर मात्र सोईस्कर भूमिका बदलली आहे. अंतर्गत राजकारणात पक्षातीलच व्यक्तींची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याची खेळीही जोमात सुरु आहे. विशेष म्हणजे संघांशी एकनिष्ठ असणाऱ्या आणि भाजपसाठी एकदिलाने कार्य करणाऱ्यांना बाजूला सारण्याचे कारस्थानही रचले जात आहे. त्यात ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजपने सत्तेसाठी ज्या पक्षांवर भ्रष्टाचारासह विविध आरोप केले, त्या पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये सामावून घेतले आहे. मात्र एकनिष्ठ भाजपेयींना वाऱ्यावर सोडले आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणात एकनिष्ठ नेत्यांचा , कार्यकर्त्यांचा बळी घेतला जात आहे. इतकंच काय ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून भरीव कार्य केले. त्यांच्या विकासकामांवर, पाठपुराव्यावर एकप्रकारे ‘ आयत्या पिठावर रेघोट्या’ मारण्याचे उद्योग सुरु झाले आहेत. हीच बाब चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे चांदणी चौक नूतनीकरणासाठी प्रारंभीपासून पाठपुरावा करणाऱ्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना श्रेयापासून ‘वंचित’ ठेवण्याचे कारस्थान शहर भाजपमध्ये सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येणाऱ्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या मतदारसंघावर विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील ‘कब्जा’ मिळवला. पक्षाचा निर्णय मान्य करून मेधा कुलकर्णी यांनी मतदारसंघ सोडला मात्र त्यामागे स्थानिक पातळीवरील कुरघोडीचे राजकारण होते आणि आजही आहे. असे चित्र आजमितीस कायम आहे आणि त्यात माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी ट्विटरसह फेसबुक या समाजमाध्यमांवर मांडलेल्या व्यथेमुळे त्याला पुन्हा पुष्टी मिळाली आहे.
ट्विटरसह फेसबुक या समाजमाध्यमांवर माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे कि, ‘माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितिन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”. अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?, असा प्रश्न त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.
‘माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर’
‘मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा धरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे, असं ट्विट करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.(Medha Kulkarni)( Chandni Chowk Flyover)BJP: “The ‘difference’ in the party with difference is over!