Baramati Lok Sabha Constituency BJP NCP

Baramati Lok Sabha Constituency:यंदा वाढलेले १ लाख मतदार कुणाच्या पदरात ! 

 ‘बारामती’मध्ये ताई की वहिनी,’लाख’ मोलाचा फायदा कुणाला? 

पुणे (प्रवीण पगारे) बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) यंदाची लढत गाजणार आहे. खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule)या पुन्हा विजयी होतात की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या सुळे यांना धोबीपछाड देतात यापेक्षा भाजपचे (BJP) मनसुबे यंदा यशस्वी होतात का ? हाच मुद्दा राजकीय आखाड्यात महत्वाचा ठरणार आहे. राष्ट्रवादीचे(NCP) विभाजन करून भाजपने नणंद – भावजय यांना  एकमेकांविरुद्ध पदर खोचून लढायला भाग पाडण्याचे राजकारण यशस्वी केले असले तरी यंदा या मतदारसंघात १ लाखांनी मतदार वाढले आहेत. त्यामुळे ही वाढलेली मते कुणाच्या पदरात जातात आणि हा ‘ लाख’मोलाचा फायदा ताईंना होतो की वहिनींना याकडेच उभ्या  महाराष्ट्राचे (Maharashtra)लक्ष असणार आहे. 
   दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अटीशर्तींनुसार ‘घड्याळ’ चिन्ह वापरताना जिथे जिथे हे चिन्ह वापरले जाईल तिथे तिथे ‘घड्याळ  चिन्ह वापराबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे’ हे लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ऐनवेळी सुनेत्रा पवार यांना कमळ या चिन्हावर निवडणूक लढविण्यास भाग पाडण्याचे षडयंत्र भाजपचे आहेत का ? त्यात ते सफल होतील का असे अनेक प्रश्न आतापासून निर्माण झाले आहेत. 
बारामती लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे या आहेत. २०१९ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करून १ लाख ५५हजार ७७४ इतके मताधिक्य त्यांनी मिळवले. 
या मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या दौंड,इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, खडकवासला  या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप या पक्षांचे प्रत्येकी दोन आमदार विधानसभा मतदारसंघात लोकप्रतिनिधित्व करीत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात  पुरंदर, भोर ,वेल्हा, मुळशी, खडकवासला, इंदापूर, बारामती आणि दौंड हे तालुके येतात. लोकसभा निवडणुकीत भाजपचा  प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळा उमेदवार ऐनवेळी रिंगणात उतरवला जातो.एकप्रकारे कोणतीही तयारी नसल्याने ही बाब राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडत आलेली आहे. एकतर तुल्यबळ उमेदवार नसणे हेच भाजपच्या अपयशाचे कारण आहे. त्यात पवार घराण्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याची भाजपची पद्धत काही काळापासून सुरु आहे आणि तशी टीका करणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी दिली जात आहे.हे मतदारांना पटलेले नाही आणि त्यामुळेच भाजपचा पाडाव होत आहे. खालच्या पातळीवरील टीकेचे राजकारण भाजपच्या अंगलट येत आहे. रासपचे महादेव जानकर असो किंवा गोपीनाथ पडळकर यांना  उमेदवारी देऊन काय मिळवले ? याचे आत्मचिंतन आजवर भाजपने केलेले नाही.मात्र आज ज्या पवार घराण्यावर भाजपने खालच्या पातळीवर टीका केली.त्याच घराण्यातील अजित पवार यांना महायुतीत सामावून घेतले आहे.त्यामुळे भाजपची ही खेळी कितपत यशस्वी होते याबाबत  राजकीय वर्तुळात संभ्रम आहे. त्यात या लोकसभा मतदारसंघात २०१९ ला २२ लाख १४ हजार मतदार संख्या होती.  ती यंदा म्हणजे २०२४ ला १ लाखांनी वाढून २३ लाख १५ हजार झाली आहे.
 
नागरिक स्थलांतरित झाल्याने ही मतदार संख्या वाढल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण असले तरी ही वाढलेली मते कुणाला हातभार लावतात हा प्रश्नही  यंदा महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे २०१९ ला १लाख ५५ हजार ७७४ चे मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांचे यंदा मताधिक्य कितीने वाढणार हाही एक चर्चेचा विषय सध्या ठरला आहे.त्यात सुप्रिया सुळे यांना  राष्ट्रवादीच्या विभाजनाचा निश्चित फायदा होणार असा आशावाद एकीकडे व्यक्त होत असला तर दुसरीकडे दौंड, इंदापूर, खडकवासला या मतदारसंघात भाजप – एकनाथ शिंदे गटाची शिवसेना ही सुळे यांच्या मतांचे समीकरण बिघडवू शकते असाही मतप्रवाह राजकीय अभ्यासकांमध्ये  आहे. जिथे याअगोदर भरघोस मते मिळायची ,अन्य मतदारसंघातील कमी मते भरून काढली जायची त्या ‘बारामती’मध्ये यंदा ताई – वहिनी यांच्या लढतीमुळे मतांचे विभाजन होणार आहे. त्यामुळे एक लाख मतदार जे वाढले आहेत.त्यांचे मत कुणाच्या पारड्यात पडते हा भाग यंदा महत्वाचा आहे. मागील लोकसभा निवडणुकांमधील मतदारांचा तपशील पाहिल्यास २००९ मध्ये एकूण मतदारसंख्या १५ लाख  ९३ हजार ४६० होती. त्यापैकी ७ लाख ३५ हजार ३८१ एकूण मतदान झाले होते. मतदानाचे प्रमाण हे ४६.१५ टक्के होते.   २०१४ मध्ये एकूण मतदारसंख्या १८ लाख  १३ हजार ५५३  होती. त्यापैकी १० लाख ६६ हजार ९६३ एकूण मतदान झाले होते. मतदानाचे प्रमाण हे ५८. ८३टक्के होते.   तर   २०१९ मध्ये एकूण मतदारसंख्या २१ लाख १२ हजार४०८  होती. त्यापैकी १२ लाख९९ हजार ७९२  एकूण मतदान झाले होते. मतदानाचे प्रमाण हे ६१. ५३टक्के होते.   गतवेळचे सहा विधानसभा निहाय मतदान पाहिले तर भाजपला  ( महायुतीला ) एकूण ५ लाख ३० हजार ९४० तर राष्ट्रवादीला ( विभाजनापूर्वी )  – महा आघाडीला ६  लाख ८६हजार ७१४ तर वंचितला ४४हजार १३४ आणि नोटा ७८६८,इतर ३५०७२ असे एकूण १३ लाख ४ हजार ७२८ मतदान झाले. त्यामुळे या मतदारसंघात वाढलेली १ लाख मतदार  पाहता मतदानाचे प्रमाण किती राहील यावरच सुनेत्रा पवार यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. 
 
लेटरबॉम्ब, अजित पवार यांचे सख्खे भाऊ, पुतण्या आणि अन्य कुटुंबीय हे विरोधात गेल्याने अजित पवार कुटुंबीय एकटे पडले आहे. भाजपने पवार कुटुंबियात ही फूट पाडली असली तीच भाजप उद्या अजितदादा पवारांना वाऱ्यावर सोडून मोकळी झाल्यास काय ? यावरही या मतदारसंघात चर्चा झडत आहे. त्यात  पुणे  लोकसभा मतदारसंघात यंदा ७२ हजार मतदार कमी झाले आहेत.ते खडकवासला मतदारसंघात शिफ्ट झाले असतील त्याचा फटका भाजपला पुण्यात बसणार आहे. परिणामी शरद पवार यांच्या  पराभवाची वल्गना करणाऱ्या भाजपला मोदींसाठीचे एक मत तारणार की महागात पडते ?हा भाग यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्ये असणार आहे.

Baramati Lok Sabha Constituency

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *