Ashok Chavan's question: The Twitter handle of the Chief Minister of Karnataka is fake; How are you still active?

Ashok Chavan’s question:कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे ट्विटर हॅंडल फेक; मग ते अजूनही सक्रिय कसे?

नागपूर।कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. बोम्मई यांच्या  (Karnataka CM B.S. bommai)  अधिकृत ट्विटर हॅंडलवरून (Twitter handle) केलेल्या चिथावणीखोर ट्वीट्सबाबत महाराष्ट्राची दिशाभूल केली जात असून, या गंभीर प्रकरणावर राज्य सरकार गप्प का आहे? असा थेट  सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.शिवाय ते ट्विटर हॅंडल फेक असेल तर मग आतापर्यंत महाराष्ट्राबाबतचे ते आक्षेपार्ह ट्विट डिलिट का करण्यात आले नाहीत? ते अकाऊंट अजूनही सक्रिय कसे आहे? असे प्रश्नही उपस्थित केले आहेत. 

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला.   चव्हाण म्हणाले की, बोम्मई यांनी केलेल्या ट्विट्ची भाषा आक्षेपार्ह होती. त्यावर प्रक्षोभ उडाल्यानंतर ते ट्विटर हॅंडलच फेक असल्याचा खुलासा करण्यात आला.पण , बोम्मई यांचे ते ट्विटर हॅंडल जानेवारी २०१५ पासून सक्रिय आहे. ट्विटरने त्याला व्हेरिफाय देखील केले आहे. त्या हॅंडलवर अजूनही कर्नाटक सरकारद्वारे घेतल्या जाणाऱ्या शासकीय निर्णयांची माहिती दिली जात आहे. ते ट्विटर हॅंडल फेक असेल तर मग आतापर्यंत महाराष्ट्राबाबतचे ते आक्षेपार्ह ट्विट डिलिट का करण्यात आले नाहीत? ते अकाऊंट अजूनही सक्रिय कसे आहे? अशा अनेक प्रश्नांची सरबत्तीच चव्हाण यांनी केली.

दोन्ही राज्यात वाद पेटल्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी बैठक घेतली व हा प्रश्न सामोपचाराने हाताळण्याचा सल्ला दिला. मात्र  महाराष्ट्राची भूमिका नेहमीच सामंजस्याची राहिली आहे. चिथावणी देण्याचे काम तर कर्नाटककडून सुरू आहे. तेथील मुख्यमंत्री चिथावणीखोर भाषा करतात. तरीही त्यांना कठोर शब्दात प्रत्युत्तर दिले जात नाही. त्या वादग्रस्त ट्विटचे प्रकरण दाबण्याच्या कर्नाटक सरकारच्या प्रयत्नांना जणू महाराष्ट्र सरकारही मदत करत आहे. राज्यातील सरकारने याबाबत नरमाईची आणि बोटचेपी भूमिका का घेतली आहे? अशीही विचारणा अशोक चव्हाण यांनी  यावेळी केली.(Ashok Chavan’s question:कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे ट्विटर हॅंडल फेक; मग ते अजूनही सक्रिय कसे?)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *