नवी दिल्ली। केजरीवाल भ्रष्ट नाही किंवा दहशतवादी नाही तर तो जनतेचा लाडका नेता आहे,हेच भाजपच्या पोटदुखीचे कारण आहे,असा ठाम दावा करताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party)राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मी दहशतवादी किंवा भ्रष्टाचारी असलो तर मला तुरुंगात टाका असे थेट आव्हान भाजप (BJP) पर्यायाने मोदी (Narendra Modi)सरकारला दिले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल आणि त्यांचे सरकार भ्रष्ट असल्याचा आरोप केला होता. केजरीवाल यांनी या आरोपांना आता प्रत्युत्तर दिले आहे. पंजाब विधानसभा निवडणुका जवळ आल्या, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल दहशतवादी असल्याचा आरोप केला होता. केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्याची चौकशी सुरू केली. त्या चौकशीची पुढे काय झाले? असा सवालही केजरीवाल यांनी केला आहे. आता गुजरात विधानसभा निवडणुका जवळ आल्या की, केजरीवाल भ्रष्ट आणि दहशतवादी असल्याचा आरोप भाजप करत आहे. मी जर भ्रष्ट किंवा दहशतवादी आहे, तर मला तुरुंगात टाका. असे थेट आव्हान केजरीवाल यांनी दिले आहे. कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की मतदारांची दिशाभूल करण्यासाठी भाजपकडून बिनबुडाचे आरोप केले जातात ;मात्र केजरीवाल भ्रष्ट नाही किंवा दहशतवादी नाही,तर तो जनतेचा लाडका नेता आहे. हेच भाजपच्या पोटदुखीचे कारण आहे. असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.