आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मनसे (MNS) असू द्या अथवा भाजप (BJP), राष्ट्रवादी (NCP) आणि अन्य राजकीय पक्षांनी आता औरंगाबादवर आता लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्तासमीकरणाची गणिते असली तरी शिवसेनेचा (SHIVSENA) गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये आता सर्वपक्षीय नेत्यांचा वावर(Political Party Concentration In Aurangabad) वाढला आहे. त्यात मनसेने थेट शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी औरंगाबादमध्ये सभेचा घाट घातल्याने,त्याचा नक्की कुणाला फायदा होतो, यापेक्षा कोणता पक्ष याचा पुरेपूर फायदा उठवतो हा मुद्दा राजकीय वर्तुळात महत्वाचा ठरला आहे.
सद्यस्थितीत औरंगाबादमध्ये महाराष्ट्रदिनी १ मे रोजी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (MNS supremo Raj Thackeray) यांची जाहीरसभा होणार आहे मात्र सभा होईल कि नाही यावरून संभ्रम निर्माण केला जात आहे. सभेला अद्यापही पोलिसांनी परवानगी दिलेली नसली तरी ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा गाजल्या होत्या, त्या मैदानावर आता मनसेने सभेची तयारी चालवली आहे. विशेष म्हणजे या सभेवर ‘गदा’ आणण्याचे शह काटशहाचे राजकारणही पेटले आहे. एक दिवसापूर्वी औरंगाबाद शहरात येत्या ९ मे पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू झाल्याची वार्ता पसरत नाही तोच औरंगाबाद पोलिसांकडून असा कोणताही आदेश पारित केलेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले गेले मात्र गृहमंत्र्यांकडून राज ठाकरे यांच्या सभेबाबत सर्वस्वी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निर्णय घेतील अशी भूमिका मांडली गेली. त्यामुळे ठाकरे यांची सभा होईल कि नाही याबाबत चित्र स्पष्ट नाही.काही वर्षांपूर्वी मनसेचे तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण झाली होती. त्यावेळी ठाकरे यांच्या सभेला चार तास आधी परवानगी देण्यात आली होती. आताही १ मे च्या सभेसाठी पोलिसांनी सभा स्थळ बदलण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे यावेळी सभेला ऐनवेळी परवानगी दिली जाते का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
एकीकडे औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार असली तरी दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जिल्ह्यातील भेटी वाढल्या आहेत. मागील आठवड्यात नेत्या सुप्रिया सुळे, राजेश टोपे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शहरात सभा घेत अनेक घोषणा केल्या. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत सभा घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मनसेचे पदाधिकारी शहरात सक्रीय झाले आहेत. मात्र बालेकिल्ल्यात मनसे मुसंडी मारत असल्याचा धसका शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे शहरात सध्या मनसे आणि शिवसनेत चांगलीच खडाजंगी उडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजप, राष्ट्रवादीसह इतर पक्षांनीही शहराकडे मोर्चा वळवला आहे.
24 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड या भाजप नेत्यांनी रस्त्याच्या उद्घाटनानिमित्त कार्यक्रम घेतला. जिल्ह्यासाठी काही घोषणा नितीन गडकरी यांनी केल्या. त्यात चिकलठाणा – वाळूज पूल आणि औरंगाबाद – पुणे हा नवा मार्ग सुरु करणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली. तर डॉ. कराड यांनी व्यासपीठावर बसलेल्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर थेट समोरच टीका करत वीस वर्ष खासदार असताना काय काम केले, असा जाब विचारला. त्यामुळे सेनेच्या गडात भाजप वरचढ होण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
महाविकास आघाडी सरकारचा घटक असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जिल्ह्यातील भेटी वाढल्या आहेत. मागील आठवड्यात नेत्या सुप्रिया सुळे, राजेश टोपे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. 24 एप्रिलला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली, तर 26 एप्रिल रोजी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजेश टोपे, धनंजय मुंडे या नेत्यांनी एकाच व्यासपीठावर दोन कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यामुळे महापालिकेत जास्त संख्या नसलेली राष्ट्रवादी जिल्ह्यात सक्रिय होऊ पाहत असल्याचे स्पष्ट होत आहे.
औरंगाबाद शहर शिवसेनेचा बालेकिल्ला समाजाला जातो. मागील ३० वर्षांमध्ये महापालिकेवर शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. भाजपला त्यांनी सोबत घेत निर्विवाद सत्ता गाजवली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सतत सेनेने राजकारण केले. मात्र भाजप सोबत ‘काडीमोड’ होताच , भाजपने नागरी सुविधांवरून सेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यात आता दिवंगत बाळासाहेब ठाकरे नेहमी सभा घेत असलेल्या संस्कृतिक क्रीडा मंडळ मैदानावर राज ठाकरे सभा घेणार असून हिंदुत्वाची किनार त्याला देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे मतदार फोडण्यासाठी मित्र पक्ष आणि विरोधी पक्ष पुढे सरसावले आहेत का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात महत्वाचा ठरला आहे.