पुणे|प्रविण पगारे
आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजपने आतापासूनच विकासकामे त्यातही फुटपाथ, रस्ते यावरून ‘अभिमान’ अशा स्वरूपाचे ‘ब्रॅण्डिंग’ सुरु केले आहे .पण या ब्रॅण्डिंगचे ‘पोस्टमार्टेम’ करण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांचे पुन्हा’ भांडवल’ करून राष्ट्रवादीने भाजपविरोधात ‘पोलखोल’ मोहीम सुरु केली आहे आणि त्यात नागरिकांनाच सहभागी करून भाजपविरोधी वातावरण निर्मिती करत आहे. तर कोरोना काळात अत्यावश्यकच्या नावाखाली झालेल्या कोट्यवधीं रुपयांच्या खर्चात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका काँग्रेसने भाजपवर ठेवला आहे. श्वेतपत्रका काढण्याची मागणी करून काँग्रेसने भाजपची कोंडी केली आहे.त्यात नाराजांची संख्या भाजपमध्ये वाढत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतरची ‘टांगती तलवार’ही आहे. परिणामी सत्ताधारी भाजपला विकासकामांचे ब्रॅण्डिंग करायचे की आरोप – प्रत्यारोपांनाच सामोरे जायचे? याच पेचात अडकावे लागणार आहे. एकप्रकारे आता कसोटीचा काळ असला तरी भाजपची आगामी ‘वाट’चाल बिकट ठरते का ? त्यातून कसा मार्ग काढते याकडेच सर्वांचे लक्ष आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. त्यानुसार आता रणनीतीही आखण्यात येत आहे.त्यात सध्यातरी राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. सत्ताधारी भाजपची कोंडी करण्यासाठी एक एक मुद्दे उकरून काढायचे आणि जनमाणसात ते ‘रुजवायचे’ या पद्धतीने राष्ट्रवादी तयारीला लागली आहे.रस्त्यांवरील खड्ड्यांचे भांडवल करून आधी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीने फुटपाथ आणि रस्ते यावरून ब्रॅण्डिंग करणाऱ्या भाजपची पोलखोल करण्याची मोहीम चालवली आहे. मात्र त्यामागे भाजपला विकासकामांचे श्रेय घेण्यापेक्षा आरोपांना प्रत्युत्तर देण्यातच अडकवून ठेवण्याची चाल राष्ट्रवादीची असल्याचे स्पष्ट होत आहे आणि त्यांना जे अपेक्षित आहे,त्यानुसार भाजपच्या गोटातून प्रत्युत्तरही मिळत आहे. रस्त्यावरील खड्डे असू द्या किंवा अँमॅनिटी स्पेसचे प्रकरण अशा अनेक विषयांवर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे आणि पुणेकरांमध्ये सकारात्मक वातावरण निर्मिती करताना ‘एका दगडात’च्या धर्तीवर भाजपलाही गारद करत आहे. त्यामुळे विकासकामांचे ब्रॅण्डिंग करायचे की आरोपांना उत्तर द्यायचे या प्रश्नांने जितके ग्रासले आहे ,त्याहीपेक्षा खड्ड्यांचे भांडवल करून काँग्रेसला पालिकेच्या सत्तेतून हद्दपार करणाऱ्या राष्ट्रवादीचीच धास्ती भाजपला राहणार आहे. नाहीतरी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकणाऱ्या राष्ट्रवादीने भाजप -शिवसेनेला घेऊन पुणे पॅटर्नची सत्ता पालिकेत आणली मात्र स्वतः कारभारी आणि दोन्ही पक्ष नामधारी अशी ‘किमया’ही साधली. त्यावेळी कोणते प्रकल्प झाले, कोणते प्रस्ताव दिले आणि त्यानुसार आज शहरात कसे प्रकल्प साकारत आहे,हे मुद्दे नंतर येणार असले तरी त्यात कोंडी कुणाची होणार हा खरा मुद्दा आहे. दुसरीकडे रस्त्यांवरील ज्या खड्ड्यांमुळे पालिकेवरील एकहाती सत्ता गमवावी लागली, त्या काँग्रेसने सद्यस्थितीत असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांचे ‘भांडवल’ करण्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही. काही मोजके आंदोलने झाली पण पक्ष काही एकसंध दिसला नाही. आता काँग्रेसने भाजपला खिंडीत गाठण्यासाठी कोरोना काळात झालेल्या खर्चाचा हिशोब मागितला आहे. श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली आहे आणि भ्रष्टाचाराचा आरोपही भाजपवर केला आहे.पण त्यातून पुणेकरांसाठी काय साध्य होणार हाच खरा प्रश्न आहे. गटातटात विखुरलेली काँग्रेस आज एकवटली आहे पण तो एकोपा नंतर राहील का ? याची शाश्वती नाही. त्यामुळे काँग्रेसची रणनीती काय, यापेक्षा व्हिजन काय हेच महत्वाचे ठरणार आहे. असे जाणकारांचे म्हणणे आहे. तूर्तास राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच खरी लढाई आहे.काँग्रेसला अस्तित्वापेक्षा वर्चस्व प्राप्त करण्याचे ध्येय ठेवून लढावे लागणार आहे. शिवसेना , महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष बळकटीकारणावर भर देत आहे.