पुणे| काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra) राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी एक भाष्य केले आहे.
अजित पवार म्हणतात, भारत जोडो यात्रेला पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळत आहे.मात्र भारत जोडो यात्रा संपल्यानंतर हे वातावरण टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. अनेकदा चांगल्या पद्धतीने गोष्टी होतात आणि दोन महिन्यात लोक विसरून जातात असं होता कामा नये असा सल्लाही अजित पवारांनी काँग्रेसला दिला आहे.(Ajit Pawar: Spontaneous response to Bharat Jodo Yatra; But…)
दरम्यान राज्यातील ओला दुष्काळ जाहीर न करण्यावरून अजित पवारांनी राज्य सरकारवर टीकाही केली आहे. दिवाळी आधी ओला दुष्काळ जाहीर करा असं सरकारला सांगितलं होतं ;पण दोघांनीही ते अजून केलं नाही. खरिपासह रब्बीचेही नुकसान झालं. विम्याचे पैसे मिळत नाहीत. त्याचे मोठे आकडे पाहायला मिळतात ;पण तुटपुंजी रक्कम देतात, त्याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिर्डी येथे आयोजित केलेल्या दोनदिवसीय मंथन शिबिराच्या समारोपाच्या संपूर्ण दिवसभर विरोधी पक्षनेते अजित पवार अनुपस्थित राहिल्याने नाराजीच्या चर्चाना उधाण आले होते. पहिल्या दिवशी रात्रीपासूनच ते शिबीरस्थळी दिसले नसल्याचे सांगितले जात होते. त्यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाणही आले मात्र नाराजीसह तर्कवितर्कांवर अजित पवार यांनी भाष्य केले आहे.
कारण नसताना माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, उगाच माझी प्रतिमा मलीन केली. मी पळून जाणारा माणूस नाही, मी कोणत्याही गोष्टीला सामोरा जाणार माणूस आहे, असंही ते म्हणाले. अजित पवार यांनी यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विधानावर बोलण्यासही नकार दिला. आपण मुंबईत स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.