Pune Municipal Corporation Election 2022: Push to BJP: 'Incoming' begins in NCP

Pune Municipal Corporation Election 2022: :भाजपला  धक्का,राष्ट्र्वादीत ‘ इनकमिंग’ सुरु 

  फोडाफोडीचे राजकारण जोमात
 पुणे |
पुणे महानगरपालिकेची (Pune Municipal Corporation Election 2022)  प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षात हालचालींना  वेग आला असून ‘ फोडाफोडी’चे राजकारणही सुरु झाले आहे.  प्रभाग रचनेवरून एकीकडे हरकती – सूचनांचा ‘पाऊस’ पडत असताना आता भाजपला  ‘ गळती’ लागण्यास प्रारंभ झाला आहे.वडगावशेरी विधानसभा मतदारसंघांत भाजपच्या नगरसेविकेच्या पतिराजांनी आता हाताला ‘घड्याळ ‘बांधल्याने राष्ट्र्वादीतीत ‘ इनकमिंग’ ला  जोरात सुरुवात झाली आहे.
 वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या ( bjp)  नगरसेविका शितल सावंत यांचे पती अजय सावंत यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने या मतदारसंघात भाजपला गळती लागण्यास सुरुवात झाली आहे. नगरसेविका शितल सावंत याही लवकरच भाजपला सोडणार असल्याची चर्चा आहे.अजय सावंत हे राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांचे समर्थक असून गेल्या निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यंदाच्या प्रभाग रचनेत त्यांचा प्रभाग अनुकूल झाल्याने, विजय सहजशक्य आहे.
सावंत यांनी कार्यकर्त्यांसह आमदार सुनील टिंगरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने या मतदारसंघात आता मोठ्याप्रमाणावर पक्षांतर होणार आहे. प्रभाग क्रमांक १सह अन्य प्रभागातून   येत्या काही दिवसात भाजपचे माननीय, पदाधिकारी पक्षाला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात आहे.   प्रभाग रचनेत भाजपवर ‘ होत्याचं नव्हतं ‘ अशी वेळ ओढावल्याने, त्यात राष्ट्रवादीकडून ( NCP )भाजपवर सातत्याने टीकास्त्र आणि एकहाती सत्तेचा ‘गजर’ होत असल्याने राजकीय वर्तुळात तूर्तास राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण झाले आहे. किंबहुना त्यात राष्ट्रवादीची  प्रचाराच्या आधीच सरशी  झाल्याचे चित्र आहे.
वडगाव शेरी हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीचा प्रतिष्ठेचा बनला आहे . गत विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी भाजपचे जगदीश मुळीक यांचा पराभव करून या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. यंदाच्या पालिका निवडणुकीच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी  पुन्हा हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी माजी आमदार व भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे प्रयत्न करत असले तरी युवकांची शक्ती आमदार सुनील टिंगरे ( MLA Sunil Tingre) यांच्या भोवतीच केंद्रित असल्याने जगदीश मुळीक यांना या मतदारसंघावर पुन्हा पकड मिळविणे  शक्य नाही. त्यात पालिकेवर पुन्हा एकहाती सत्ता खेचण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असले तरी सद्यस्थितीत जे कारभारी आहेत, त्यांना आता थेट लोकसभेची भुरळ पडली आहे. त्यात मुळीक हेही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. मात्र मतदारसंघावर पकड मिळवता येत नसली तरी आता भाजपमधून होणाऱ्या पक्षतंराला रोखायचे कसे या प्रश्नाला त्यांना सामोरे जावे लागणार हे अटळ असल्याची चर्चा या मतदारसंघात आहे.
हडपसर आणि वडगावशेरी  या दोन मतदारसंघात नगरसेवकांची संख्या पाहता, सत्तेची मोट बांधण्यासाठी हे मतदारसंघ जमेचे  ठरणार आहेत. त्यात नव्या प्रभाग रचनेत जातीनिहाय मतांचे समीकरण राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार तर आहे शिवाय गत निवडणुकीवेळी ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, ते पुन्हा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादीत परतणार  आहेत मात्र गत विधानसभा निवडणुकीवेळी  विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांची ऐनवेळी ज्यांनी साथ सोडली,त्यांच्याविरोधात काम केले,अशांच्या ‘घरवापसी’ला मात्र आमदार टिंगरे समर्थकांचा तीव्र विरोध असल्याची चर्चा  आहे. सद्यस्थितीत भाजपमध्ये गेलेल्यांच्या कल पुन्हा राष्ट्रवादीकडे आहे ;पण पक्ष नेतृत्व कोणता निर्णय घेईल याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीने  भाजपचे  १६ नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला असून येत्या पंधरा दिवसात  आणखी पक्ष प्रवेश होणार आहेत. मात्र शहरातील विविध प्रभागांमधून असे पक्ष प्रवेश करून  घेताना भाजपला  त्यात गुंतवून ठेवायचे अशी रणनीती असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सिंहगड रस्ता   परिसरातही येत्या दहा दिवसात भाजपला  भगदाड पडेल असा दावाही सूत्रांनी केला आहे.भाजपमधील अंतर्गत गटबाजीतून हे पक्षांतर होणार असल्याचेकडे  सूत्रांनी  लक्ष वेधले आहे. त्यात एका बांधकाम व्यवसायिकाला मानणारे समर्थक कोणती भूमिका घेतात याकडेही भाजपच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *