पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका
नवी दिल्ली| कोरोनाच्या भारताने संकटावर मात केली आहे. पण विरोधकांनी कोरोना महामारीमध्येही राजकारण केले आहे. महाराष्ट्र काँग्रेस देशभरात कोरोना पसरवण्यास जबाबदार आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना कोरोना महामारीच्या काळात स्थंलातर करायला लावले. परप्रांतियांना तिकिटे काढून देऊन स्थलांतर करण्यास भाग पाडले, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांवर चांगलीच टीका केली.
देशभरात कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने केल्याचा आरोप संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना काळात सर्वांनी जिथे आहात तिथेच थांबा, असे म्हटले होते. पण काँग्रेसने यूपी-बिहारींना मुंबईतून बाहेर जाण्यासाठी उकसवले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने तर कोरोना लॉकडाऊनमध्ये हद्दच केली, त्यांनी मुंबईतील परप्रांतीय मजुरांना रेल्वेची मोफत तिकीटे काढून दिली आणि महाराष्ट्रावरील बोजा कमी करण्याचे आवाहन केले. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन बाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून त्यांनी काँग्रेसनेच देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप केला. यूपी बिहारमध्ये जाऊन कोरोना पसरवा, असे ते स्थलांतरीत मजुरांना सांगत असल्याचे आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.यावेळी काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभागृहात गोंधळही घातला.त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पराभवानंतरही काँग्रेसचा अहंकार जात नाही. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काँग्रेसला मते नाहीत. गोव्यात पुन्हा सत्ता मिळाली नाही. मतदार काँग्रेसला नाकारत आहेत. विरोधक 2014 च्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. उपदेश देताना काँग्रेस सत्तेतील 50 वर्ष विसरत आहे.
गरीबदेखील लखपती
देश सध्या नवे संकल्प घेऊन पुढे जात आहे. गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधेत भारताने वेगाने प्रगती केली. पंतप्रधान आवास योजनेमुळे गरिबांना घरे मिळाली आहेत. घरे मिळाल्यामुळे गरीबदेखील लखपती झाला आहे.