मुंबई ।
महाराष्ट्रात विदर्भात काँग्रेस पुढे आहे. पश्चिम महाराष्ट्रात आम्ही काही ठिकाणी पुढे आहोत. कोकणातही आम्ही खाते उघडले आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी काम केले आहे. भंडाऱ्याचा निकाल अजून मिळायचा आहे. अनेक ठिकाणी जागा वाटपात गोंधळ होऊ नये, यासाठी स्वबळावर आम्ही निवडणूक लढलो. जनतेने त्याला भरभरुन यश दिले.अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. राज्यात जनतेने महाविकास आघाडीला पसंती दिली आहे. मात्र राज्यात काँग्रेस वेगळी लढल्याने जागा घटल्याचे बोलले जात आहे, या प्रश्नावर बोलताना ‘मला राष्ट्रवादी किंवा कोणावर आरोप करायचा नाही. आम्ही अनेक भागात वाढलो आहोत. पक्ष विस्तारासाठी वेगळ लढावे लागते,’ असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने चांगली मुसंडी मारली आहे. याचे सर्व श्रेय महाराष्ट्रातील जनतेचे आहे. त्यांच्या आर्शीवादामुळेच निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि हा निकाल लागला.
जनतेच्या आर्शीवादामुळेच निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे नाना पटोले यांनी यावेळी नमूद केले.
देश विकायला भाजप मोठा पक्ष
राज्यात भाजप मोठा पक्ष असल्याचा दावा, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यावर बोलताना पटोले म्हणाले चंद्रकांत पाटील हे बरोबर बोलतात. त्यांचा पक्ष सर्वात मोठा आहे. देश विकायला भाजप मोठा पक्ष आहे. पट्टी डोळ्याला बांधून भाजप बोलत असल्याचा टोला पटोले यांनी पाटील यांना लगावला.
… तर गोव्यात आघाडी का करू?
गोवा विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य करताना पटोले म्हणाले , गोव्यात काँग्रेसची ताकद आहे. तेथे आमचीच सत्ता येईल. बहुमताचे सरकार काँग्रेसचे बनत असेल तर आघाडी का करु? प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करायचा अधिकार आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक या विधानसभा, लोकसभा निवडणुकापेक्षा वेगळ्या असल्याची भूमिका पटोले यांनी मांडली.