मुंबई|
राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा या उपक्रमामुळे राष्ट्रवादी पक्ष राज्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे, अशा शब्दात राज्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.
राज्यातील बहुतांश नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले आहेत. हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरल्याची प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा करून तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रमे हाती घेतली होती.तसेच जनता दरबार उपक्रमातून जनतेची कामेही तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाही फायदा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला आहे. या निकालांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. पक्षासाठी सदैव काम करणाऱ्या, पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करताना सर्व कार्यकर्त्यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.